
अॅशेस कसोटी मालिकेतील अखेरच्या दोन सामन्यांतून बाहेर राहण्याचा निर्णय हा माघार नव्हे, तर मोठया ध्येयासाठी उचललेले पाऊल असल्याचे ऑस्ट्रेलियन कर्णधार पॅट कमिन्सने स्पष्ट केले आहे. फेब्रुवारी 2026 मध्ये हिंदुस्थान-श्रीलंकेत होणाऱ्या टी-20 विश्वचषकावर कमिन्सने पूर्ण लक्ष केंद्रीत केले असून त्यासाठी आतापासूनच तयारीला सुरुवात केली आहे.
वेस्ट इंडीज दौऱ्यात झालेल्या कंबरेच्या दुखापतीमुळे कमिन्सला अॅशेस मालिकेतील पहिल्या दोन कसोटी सामन्यांत खेळता आले नव्हते. मात्र अॅडलेडमध्ये झालेल्या तिसऱ्या कसोटीत त्याने जबरदस्त पुनरागमन करत सहा विकेट टिपले आणि आपली धार कायम असल्याचे दाखवून दिले. तरीही शरीरावर अनावश्यक ताण येऊ नये यासाठी अखेरच्या दोन कसोटींमधून विश्रांती घेण्याचा निर्णय घेतला गेला.
अॅशेसमधील पहिले तीनही सामने जिंकून मालिकेवर पकड मजबूत केलेल्या ऑस्ट्रेलियाने दीर्घकालीन नियोजनाच्या दृष्टीने कमिन्सला विश्रांती देणे योग्य ठरवले आहे. एका वृत्तवाहिनीशी बोलताना कमिन्स म्हणाला, ‘मी दुखापतीतून सावरलो असलो तरी सलग कसोटी सामने खेळणे धोक्याचे ठरले असते. पुढे टी-20 विश्वचषक आहे, त्यामुळे शरीर ताजेतवाने ठेवणे महत्त्वाचे असल्याचे त्याने सांगितले आहे.’


























































