वन विभागाने उपचारांची शर्थ करूनही न्यूमोनियाग्रस्त मादी बिबटय़ाचा अखेर मृत्यू, पाटण तालुक्यातील घटना

वन विभागाने प्रयत्नांची शर्थ करूनही न्यूमोनियाग्रस्त बिबटय़ाच्या मादीचा मृत्यू झाल्याची घटना पाटण तालुक्यातील मारुल हवेलीजवळ आज घडली आहे.

पाटण तालुक्यातील मारुल हवेलीजवळील गांधी टेकडीजवळ शाळेलगत असलेल्या रानात मंगळवारी सकाळी आठ वाजता एक बिबटय़ा निपचित पडलेला नागरिकांच्या निदर्शनास आला. नागरिकांनी वन्यजीव अपराध नियंत्रण ब्युरो तथा मानद वन्यजीवरक्षक रोहन भाटे आणि वनक्षेत्रपाल विलास काळे यांना फोन करून या गोष्टीची माहिती दिली. कराडहून पशुसंवर्धन अधिकारी डॉ. संजय हिंगमिरे, रोहन भाटे, विलास काळे अर्ध्या तासात घटनास्थळी रवाना झाले. घटनास्थळी वनरक्षक बर्गे व वनमजूर तत्पूर्वी पोहोचलेले होते. एका गाडीमधून पिंजराही आणण्यात आला होता.

या रानात बिबटय़ा निपचित पडलेला वनाधिकाऱयांनी पाहिला. दरम्यान, बिबटय़ाच्या हालचाली अतिशय मंद असल्याच्या अधिकाऱयांच्या निदर्शनास आले. मात्र, बिबटय़ाचा श्वासोच्छ्वास जोरजोरात सुरू होता. पशुसंवर्धन अधिकारी डॉ. संजय हिंगमिरे यांनी बिबटय़ाची तपासणी करून त्याला इंजेक्शन दिले. त्यानंतर बिबटय़ाला पिंजऱयात घालून उपचारांसाठी कराड येथे हलविण्यात आले. कराड येथे आल्यावर पुन्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. बोर्डे, डॉ. हिंगमिरे यांच्यासह सहकाऱयांनी बिबटय़ाची तपासणी केली. त्या वेळेस बिबटय़ाला 106 डिग्री ताप होता. त्वरित औषधे व सलाइन सुरू करण्यात आले; परंतु उपचारांदरम्यान बिबटय़ाला फिट आली. त्यातच या बिबटय़ाचा मृत्यू झाला.

बिबटय़ाच्या मृत्यूनंतर त्याचे शवविच्छेदन करण्यात आले. या वेळेस बिबटय़ाला न्यूमोनिया झाल्याचे स्पष्ट झाले. हा बिबटय़ा 1.5 वर्षाची मादी होती. तिचे वजन 30 किलो होते. बिबटय़ाचे दात, मिश्या, नखे यांसह सर्व अवयव सुस्थितीत होते. रोहन भाटे, वनक्षेत्रपाल विलास काळे, डॉ. बोर्डे, डॉ. संजय हिंगमिरे यांनी बिबटय़ाचे प्राण वाचविण्यासाठी खूप प्रयत्न केले. मात्र, त्यांना यश आले नाही.

आपली प्रतिक्रिया द्या