
सामना प्रतिनिधी । मालवण
मालवणात सर्वच किनाऱ्यांवर पर्यटन बहरत आहे. दांडी किनारीही पर्यटक मोठ्या संख्येने येत आहेत. दांडी येथील पर्यटन वाढीसाठी पतंग महोत्सव आयोजित करण्यात आला. पहिल्याच वर्षी स्थानिकांसह पर्यटकांचा मिळालेला उत्स्फूर्त प्रतिसाद पाहता पुढील वर्षीपासून आणखी मोठ्या प्रमाणात पतंग महोत्सव भरवण्यात येईल, अशी घोषणा आमदार वैभव नाईक यांनी केली. दरवर्षी 26 जानेवारीला हा महोत्सव घेण्यासाठी मच्छिमार व स्थानिकांनासोबत घेऊन नियोजन करणार असल्याचे नाईक यांनी पतंग महोत्सवाच्या उद्घाटनावेळी जाहीर केले.
गुजरात व अन्य काही राज्यात पतंग महोत्सवाचे लोण मोठ्या प्रमाणात पसरले असून अनेक पर्यटक हा महोत्सव पाहण्यासाठी गुजरातमध्ये जातात. त्यामुळे पर्यटनदृष्ट्या विकसित होत असलेल्या मालवणमध्ये पतंग महोत्सव भरवण्यासाठी आमदार वैभव नाईक यांनी पुढाकार घेऊन शनिवारी प्रजासत्ताकदिनी हा पतंग महोत्सव दांडी किनारी आयोजित केला. शिवपुतळ्याला आणि शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेला पुष्पहार घालून मान्यवरांच्या हस्ते या पतंग महोत्सवाचे उद्घाटन झाले. यावेळी आमदार वैभव नाईक, नगराध्यक्ष महेश कांदळगावकर, कोकण सिंचन महामंडळाचे माजी उपाध्यक्ष संदेश पारकर, जिल्हा व्यापारी महासंघाचे अध्यक्ष नितीन तायशेटे, आरोग्य व पर्यटन सभापती पंकज सादये, उपनगराध्यक्ष राजू वराडकर यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते.
आमदार वैभव नाईक यांनी मालवण शहरात सुरु असलेल्या विकास कामांची माहिती दिली. याठिकाणी मोठ्या संख्येने पर्यटक येतात. त्यांना चांगल्या सुविधा मिळाल्या पहिजेत. त्यासाठी बंदर जेटीवर अद्यावत टर्मिनस उभारण्याचे काम सुरू आहे. रस्ते विकासासाठी आपले प्रयत्न सुरू असून येत्या निवडणुकीपूर्वी कसाल – मालवण रस्ता नूतनीकरण करण्यात येणार असल्याची ग्वाही त्यांनी दिली. चिवला बीच पाठोपाठ दांडी बीच विकसित करण्याचे आपण हाती घेतले असून येत्या अधिवेशनात येथील बंधारा कम रस्त्यांसाठी विशेष तरतूद करण्यासाठी प्रयत्न केले जातील, असे ते म्हणाले. पतंग महोत्सवाचा पर्यटनाला निश्चित फायदा होईल, असा विश्वास नगराध्यक्ष महेश कांदळगावकर यांनी व्यक्त केला.




























































