नगरमध्ये गणेश विसर्जन मिरवणूक मार्गाचे पॅचिंग सुरू

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

लाडक्या गणरायाचे आगमन अवघ्या आठ दिवसांवर येऊन ठेपले आहे. यंदा गणेशोत्सव मोठय़ा दिमाखात साजरा होणार आहे. मनपा व पोलीस प्रशासनाकडून एक खिडकी सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. मनपा बांधकाम विभागाकडून गणेश विसर्जन मिरवणूक मार्गावर पॅचिंगच्या कामास सुरुवात करण्यात आली आहे.

नगर शहरात गणेशोत्सवाच्या तयारीला वेग आला आहे. गणेशोत्सव तोंडावर आल्याने शहरात उत्सवाची लगबग सुरू झाली आहे. 31 ऑगस्टपासून गणेशोत्सवास सुरुवात होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर नगर शहरातील मूर्तिकारांकडून बाप्पांच्या आकर्षक मूर्तींवर शेवटचा हात फिरविण्याची लगबग सुरू झाली आहे. यंदाचा सार्वजनिक गणेशोत्सव जल्लोषात साजरा होण्याची चिन्हे आहेत. राज्य सरकारने गणेशमूर्तींच्या उंचीवरील निर्बंध उठवले आहेत. त्यामुळे मूर्तिकारांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. मूर्तिकारांकडून वेगवेगळ्या आकारांतील मूर्ती साकारण्यात येत आहेत. गेली दोन वर्षे कोरोनाचे संकट होते, त्यामुळे सण, उत्सव उत्साहाने साजरे करता आले नव्हते. कोरोना काळात राज्य सरकारकडून गणेशोत्सवावर निर्बंध घालण्यात आले होते. मात्र, आता कोरोना सरल्याने निर्बंधमुक्त गणेशोत्सव साजरा होणार आहे.

दरम्यान, सार्वजनिक गणेश मंडळांच्या मंडप उभारणीसंदर्भात उच्च न्यायालयाकडून काही वर्षांपूर्वी निर्देश जारी करण्यात आले आहेत. मंडप उभारताना 50 टक्के रस्ता खुला राहील, याची काळजी घ्यावी, असे निर्देश आहेत. प्रचलित नियमानुसार मागील काही वर्षे गणेशोत्सव साजरा झाला होता. मागील दोन वर्षे कोरोनामुळे साध्या पद्धतीने गणेशोत्सव साजरा करण्यात आला. गणेश मंडळांना मंडप उभारणीच्या परवानगीसाठी मनपात एक खिडकी कक्ष स्थापन करण्यात आला आहे. तर, पोलीस प्रशासनाकडून गणेश मंडळांना एक खिडकी कक्षासह ऑनलाइन परवानगीची सुविधाही उपलब्ध करून देण्यात आली आहे.