
मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालयाच्या ज्या पायऱयांवर 60-70 च्या दशकात प्रस्थापित साहित्याच्या विरोधात बंड करण्यात आले त्याच पायऱयांवर रविवारी अविनाश उषा वसंत यांच्या ‘पटेली’ या बहुचर्चित कादंबरीचे मुंबई गिरणी कामगार भाडेकरू संघाचे अध्यक्ष किसन साळुंखे यांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले. सावित्री फुले यांच्या जयंतीचे औचित्य साधून ललित प्रकाशनने या कार्यक्रमाचे आयोजन केले होते.
‘पटेली’ ही अविनाश उषा वसंत यांची पहिली कादंबरी असून गेल्या महिनाभरापासून तिच्या आगळ्यावेगळ्या प्रमोशनमुळे चर्चेत होती. जास्तीत जास्त वाचकांपर्यंत पोहोचण्यासाठी सोशल माध्यमांचा प्रभावी वापर करून, कादंबरीतल्या वाक्यांचा टिझरच्या व्हिडीओमध्ये वापर करून, मीम हा नवा पुस्तक प्रमोशन फंडा वापरून ते सोशल माध्यमांमध्ये फिरविण्यात आले. याच बळावर कादंबरीच्या प्रिबुकिंग सवलत योजनेत 250 प्रती नोंदणी झाल्या. ‘पटेली’चे प्रकाशन ग्रंथालयाच्या पायऱयांवर करण्यामागे खास कारण होते. मराठी साहित्याला दिशादर्शक ठरलेली मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालयाची ही पायरी. गुरुनाथ धुरींपासून तुळसी परब, मनोहर ओक, प्रकाश जाधव, सतीश काळसेकर, दिलीप चित्रे, नामदेव ढसाळ, राजा ढाले, दया पवार अशी अनेक नावे या पायरीने उदयास आणली. नव्या जाणिवेचा नव्या आशयाचे लिखाण या सगळ्या कवींनी या पायरीवर बसून मराठी साहित्याला दिले. त्यातील बंध अनेक अर्थांनी महत्त्वाचे होते. निक्वळ प्रस्थापित लिखाणाला विरोध म्हणून ही पिढी लिखाण करत नव्हती तर सर्वहारा जाणिवेचं लिखाण लिहिणं हा होता. साहित्याच्या प्रवाहाला निर्मळ आणि प्रवाही ठेवणं हा होता. या पिढीचं स्मरण करून त्यांच्या ऋणात राहण्यासाठी ‘पटेली’चे प्रकाशन या कविकट्टय़ावर करण्यात आले.




























































