
भरधाव चारचाकी वाहनाने दुचाकीला दिलेल्या धडकेत मोहटादेवीच्या पुजाऱयासह कर्मचाऱयाचा जागीच मृत्यू झाला असून, एक महिला जखमी झाली आहे.
मोहटादेवीचे पुजारी विवेक उर्फ राजूदेवा भानुदास मुळे (वय 45, रा. पाथर्डी), कर्मचारी कैलास बाबासाहेब शिंदे (वय 47, रा. केडगाव, ता. नगर) अशी मृतांची नावे आहेत. यमुना हरिभाऊ भाबड (रा. वनवेवाडी, ता. आष्टी, जि. बीड) या जखमी झाल्या आहेत.
विवेक मुळे व कैलास शिंदे हे रविवारी सायंकाळी आपल्या दुचाकीवरून मोहटादेवी गडावरून पाथर्डीकडे येत होते. पाथर्डी शहराजवळील आयटीआय इमारतीसमोर भरधाव चारचाकी वाहनाने त्यांच्या दुचाकीला जोराची धडक दिली. यात मुळे व शिंदे यांचा जागीच मृत्यू झाला, तर यापूर्वी काही अंतरावर या जीपच्या चालकाने आणखी एका दुचाकीला दिलेल्या धडकेत यमुना भाबड या जखमी झाल्या. त्यांना उपचारासाठी नगरला हलवण्यात आले आहे.
दरम्यान, जीपचा चालक मद्यधुंद अवस्थेत असल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. या जीप चालकाचा काही युवकांनी पाठलाग केला. मात्र, उपयोग झाला नाही. पोलिसांनी जीप ताब्यात घेतली असून, तिच्या चालकाचा शोध घेतला जात आहे. पाथर्डी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

























































