मुलाने शेतकरी आत्महत्येवर कविता केली आणि त्याच्या वडिलांनी जीवनयात्रा संपवली

435

‘शेतात कष्ट करूनही तुझ्या डोक्याला ताप… अरे बळीराजा, करू नको आत्महत्या’ अशी कविता इयत्ता तिसरीतील मुलाने शाळेत सादर केली आणि त्याच रात्री त्याचे पितृछत्र हरपले. या मुलाच्या शेतकरी वडिलांनीच विषप्राशन करून आत्महत्या केली. ही हृदयद्रावक, मन सुन्न करणारी घटना नगर जिल्हय़ातील पाथर्डी तालुक्यात घडली.

मराठी राजभाषा दिनानिमित्त भारजवाडी येथील जिल्हा परिषद शाळेत विद्यार्थ्यांसाठी काव्यवाचन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. सहभागी विद्यार्थ्यांना स्वतः तयार केलेली कविता या स्पर्धेत सादर करण्यास सांगण्यात आले होते. त्यानुसार भारजवाडी येथील हनुमान वस्तीवर असलेल्या इयत्ता तिसरीतील प्रशांत बटुळे या विद्यार्थ्याने ‘शेतकऱयांनी आत्महत्या करू नये’ या विषयावर एक कविता स्वतः रचली व सादर केली. त्याची कविता ऐकून उपस्थितांनी त्याचे कौतुक केले. कार्यक्रम संपल्यानंतर तो घरी आला आणि रात्री उशिरा त्याचे वडील मल्हारी बटुळे यांनी विषप्राशन केल्याचे त्याला समजले. मल्हारी बटुळे यांना शेती होती, मात्र सततच्या नापिकीमुळे ते त्रस्त होते. त्यामुळे त्यांनी विषप्राशन केले. जवळच्या नातेवाईकांनी त्यांना नगर येथे हलवले, मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.

शेतात कष्ट करूनही तुझ्या डोक्याला ताप
अरे बळीराजा, नको करू आत्महत्या
पैसे नसूनही शाळेत शिकवता लेकरा
कसे उन्हात करतात शेती
पीक उगवणी मिळतात पैसे
शेती करूनही तुझ्या हाताला फोड
अरे बळीराजा, नको करू आत्महत्या

आपली प्रतिक्रिया द्या