पाथर्डी – राजकीय वादातून गोळीबार, सरपंचासह चौघे गंभीर जखमी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

पाथर्डी तालुक्यातील निंबेदैत्य नांदूर गावात राजकीय वादातून दोन गटात गोळीबार झाला. या गोळीबारात सरपंचासह चार जण जखमी झाले आहेत. मंगळवारी सायंकाळी सातच्या सुमारास ही घटना घडली. या घटनेतील दोन जखमींना अत्यवस्थ अवस्थेत नगरला हलवण्यात आले आहे.

ज्ञानेश्वर अशोक दहिफळे (30), गावचे सरपंच संजय बाबासाहेब दहिफळे (50) हे दोघे गंभीर जखमी झाले असून पुढील उपचारासाठी त्यांना नगरला हलवण्यात आले आहे. तर भीमराज जिजाबा दहिफळे (60) आणि सदाशिव अर्जुन दहिफळे (50) हे किरकोळ जखमी झाले आहेत. रात्री उशिरा पर्यंत या संदर्भात पोलीस स्टेशनला कोणत्याही गुन्ह्याची नोंद करण्यात आली नव्हती.

मिळालेल्या माहितीनुसार, गोळीबाराच्या घटनेतील गंभीर जखमी सरपंच संजय दहिफळे यांचे गावातीलच निवृत्त जवान शाहदेव उर्फ पम्प्या पंढरीनाथ दहिफळे यांच्याशी राजकीय वैर होते. या दोघांमध्ये या पूर्वी तीन ते चार वेळा वाद सुद्धा झालेले होते. मंगळवारी सायंकाळी सातच्या सुमारास गावातीलच स्व. गोपीनाथ मुंडे चौकात दोन्ही गटात मारामारी झाली. यात शाहदेव दहिफळे यांनी आपल्याजवळ असलेल्या रिव्हॉलरमधून संजय दहिफळे यांच्या छातीत दोन गोळ्या झाडल्या. यावेळी झालेल्या मारामारीत संजय दहिफळे यांच्या गटाचे ज्ञानेश्वर दहिफळे यांच्या डोक्याला जबर मार लागला तर भीमराज दहिफळे व सदाशिव दहिफळे यांना किरकोळ मार लागला.

सर्व जखमींना पाथर्डी येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी आणले. वैद्यकीय अधिकारी डॉ. विनोद गर्जे यांनी संजय दहिफळे व ज्ञानेश्वर दहिफळे यांच्यावर प्रथमोचार करून अत्यवस्थ अवस्थेत नगरला पुढील उपचारासाठी पाठवले. या घटनेने निंबादैत्य नांदूर येथे तणावपूर्ण वातावरण असून घटनेची माहिती कळताच पोलीस निरीक्षक रमेश रत्नपारखी हे घटनास्थळी दाखल झाले. पोलीस आरोपीचा शोध घेत आहेत.