पाथर्डीत पिण्याच्या पाण्यासाठी रास्ता रोको आंदोलन

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

पिण्याचे पाणी तातडीने मिळावे या मागणीसाठी आज पाथर्डी तालुक्यातील आंबेवाडी तांडा येथील ग्रामस्थांनी पाथर्डी-नगर या राष्ट्रीय महामार्गावर आंबेवाडी फाटा येथे रस्ता रोको आंदोलन केले. आंदोलनात सहभागी महिलांनी रिकामे हांडे रस्त्यावर ठेवत पाणी द्या अशी मागणी केली. पंचायत समिती मधील विस्तार अधिकारी विसारवाडी यांनी दिलेल्या आश्वासना नंतर आंदोलन मागे घेण्यात आले.

निवडुंगे ग्रामपंचायती च्या अंतर्गत आंबेवाडी येत सलून या वाडीला महसूल गावचा दर्जा सुद्धा मिळाला असला तरीही नियमित पाणीपुरवठा होत नसल्याने आज मयूर चव्हाण, कल्पना चव्हाण, योगेश राठोड, सुनील चव्हाण, सविता चव्हाण, संगीता राठोड, यशोदा चव्हाण, पारूबाई राठोड, कविता जाधव, मीरा राठोड,गीता पवार, कल्पना जाधव आदींसह ग्रामस्थांनी रास्ता रोको आंदोलन सुरु केले. जून महिना उजाडला तरीही आम्हाला पाणी मिळत नाही. ग्रामपंचायत पाणीपट्टी व घरपट्टी तातडीने वसूल करते मात्र मागणी करूनही पाणी दिले जात नसल्याने दोन किलोमीटर वरून पाणी आणावे लागते. तालुका प्रशासनाकडे सुद्धा अनेकवेळा पिण्याचे पाणी पुरवा अशी मागणी केली. मात्र आमच्या मागण्यांकडे दुर्लक्ष केले जाते, आंबेवाडी साठी स्वतंत्र पाणीयोजना मंजूर झाली असून ती कार्यान्वित करावी, आंबेवाडी येथील पाण्याचे बोअर दुरुस्त करावेत व तातडीने पाणीपुरवठा सुरु करावा अन्यथा आंदोलन मागे घेतले जाणार नाही असा इशारा आंदोलकांनी दिल्या नंतर विसारवाडी यांनी येत्या आठ दिवसात पाणीपुरवठा सुरळीत केला जाईल असे आश्वासन दिल्या नंतर आंदोलन मागे घेण्यात आले.