
अंदमानच्या समुद्रात पवनहंसचे हेलिकॉप्टर कोसळल्याची घटना मंगळवारी घडली. सुदैवाने हेलिकॉप्टरमधील सातही जणांना वाचवण्यात यश आले आहे. मंगळवारी सकाळी 9.30 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. विमानात पाच प्रवासी आणि दोन क्रू मेंबर्स होते. तांत्रिक बिघाडामुळे हा अपघात झाल्याचे प्राथमिक तपासात समोर आलं आहे.
हेलिकॉप्टरने सकाळी 8 वाजून 45 मिनिटांनी श्री विजया पुरम येथून उड्डाण केले. त्यानंतर सकाळी 9 वाजून 30 मिनिटांनी ते अंदमानच्या समुद्रात कोसळले. हेलिकॉप्टरमध्ये काही तांत्रिक बिघाड असल्याचे समोर आले. त्यामुळे पायलटने समुद्रात क्रॅश-लँडिंग केले, असे नागरी विमान वाहतूक संचालक नितेश रावत यांनी सांगितले.
धावपट्टीपासून 300 मीटर अंतरावर हेलिकॉप्टर समुद्रात कोसळले. विमानात पायलटसह एकूण सात जण होते. सर्वजण सुरक्षित आहेत. अद्याप पायलटचा जबाब घेण्यात आला नाही. सर्व जखमींवर मायाबंदर येथील डॉ. राजेंद्र प्रसाद रुग्णालयात उपचार सुरू आहेत. आम्ही जखमींना श्री विजया पुरम येथे आणण्याचा प्रयत्न करत आहोत, असे रावत पुढे म्हणाले.





























































