
अंदमान आणि निकोबार द्वीपसमूहाजवळ आज सकाळी सात जणांना घेऊन निघालेले पवनहंस कंपनीचे हेलिकॉप्टर समुद्रात कोसळले. सुदैवाने दोन वैमानिक व पाच प्रवासी बचावले. त्यांना किरकोळ जखमा झाल्या आहेत.
प्राप्त माहितीनुसार, पाच प्रवाशांना घेऊन हेलिकॉप्टर रंगाट येथील हेलिपॅडवरून सकाळी 9.10 वाजता मायाबंदर येथे जाण्यासाठी झेपावले. मात्र उड्डाण घेतल्यानंतर मायाबंदर धावपट्टी हेलिपॅडपासून अवघ्या 300 मीटर अंतराजवळ समुद्रात सकाळी 9.30 वाजताच्या सुमारास हेलिकॉप्टरची क्रॅश लँडिंग करण्यात आली. पवनहंस ही सरकारच्या मालकीची हेलिकॉप्टर कंपनी आहे. दुर्गम भागांमध्ये कंपनीच्या हेलिकॉप्टरचा वापर केला जातो. याशिवाय राजकारणीदेखील कंपनीच्या हेलिकॉप्टर सेवेचा उपयोग करतात.
अपघाताच्या चौकशीचे आदेश
नागरी उड्डयन संचालक नितेश रावत यांनी सांगितले की, जखमींना मायाबंदर येथील डॉ. राजेंद्र प्रसाद रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. आम्ही अद्याप वैमानिकांचा जबाब नोंदवलेला नाही. या अपघाताची चौकशी सुरू करण्यात आली आहे. प्राथमिकदृष्ट्या हेलिकॉप्टरमध्ये तांत्रिक बिघाड निर्माण झाल्यामुळे हा अपघात झाल्याची शक्यता आहे.































































