नरेंद्र मोदी घाबरलेले आहेत आणि तडजोडीच्या भूमिकेत, काँग्रेस नेते पवन खेरा यांची टीका

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

प्रस्तावित व्यापार करारावरून काँग्रेसने केंद्र सरकारवर जोरदार टीका केली आहे. काँग्रेस नेते पवन खेरा यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर थेट निशाणा साधत सरकारवर गंभीर आरोप केले.

पवन खेरा म्हणाले की, “आमचा जो संशय होता, तो आता खरा ठरला आहे. नरेंद्र मोदी घाबरलेले आहेत आणि तडजोडीच्या भूमिकेत आहेत.” भाजपचे नेते ज्या कराराबद्दल बोलत आहेत, त्याचे परिणाम लवकरच देशासमोर येतील आणि हिंदुस्थानला त्याचे मोठे नुकसान सहन करावे लागेल, असेही त्यांनी सांगितले.

ते पुढे म्हणाले की, वाणिज्य मंत्री पीयूष गोयल यांनी पत्रकार परिषदेत ज्या मुद्द्यांची यादी वाचून दाखवली, त्यापेक्षा लपवलेले मुद्दे अधिक महत्त्वाचे आहेत. सरकारने शेतकरी आणि एमएसएमई क्षेत्राच्या हिताचे प्रश्न स्पष्ट करावेत, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.

रशियाकडून तेल खरेदीबाबत विचारलेल्या प्रश्नावर वाणिज्य मंत्र्यांनी “याबद्दल परराष्ट्र मंत्री सांगतील” असे उत्तर दिले. त्यानंतर अमेरिकेत परराष्ट्र मंत्र्यांना विचारले असता त्यांनी “याबाबत वाणिज्य मंत्री सांगतील” असे सांगितल्याचे त्यांनी नमूद केले.

यानंतर राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल यांनी अमेरिकेला धमकावल्याचे वक्तव्य केल्याचे सांगितले गेले, मात्र त्यानंतर परराष्ट्र मंत्रालयाने स्पष्टीकरण देत डोभाल यांनी कोणालाही धमकी दिली नसल्याचे स्पष्ट केले, असेही खेरांनी सांगितले.

हा व्यापार करार देशातील कोट्यवधी नागरिकांसोबतचा मोठा विश्वासघात असल्याचा आरोपही त्यांनी केला.