
वीज वितरण कंपन्यांनी पवन ऊर्जा प्रतियुनिट 2 रुपये 52 पैसे दरानेच खरेदी करायला हवी. त्यासाठी संबंधित वीज कंपन्यांनी स्पर्धात्मक निविदा मागवाव्यात. कोणत्याही परिस्थितीत जादा दराची वीज खरेदी करू नका, असे बजावत महाराष्ट्र वीज नियामक आयोगाने टाटा पॉवरने 3 रुपये 27 पैसे दराने वीज खरेदी करण्यास मंजुरी द्यावी म्हणून वीज आयोगाकडे याचिका दाखल केली होती, ती आयोगाने फेटाळत सव्वादोन रुपयांपासून 2 रुपये 52 पैसे एवढय़ा दराने पवन ऊर्जा मिळाली पाहिजे, असे स्पष्ट केले आहे.
टाटा पॉवरने आपले नॉन सोलर अपारंपरिक ऊर्जा वापराचे टार्गेट पूर्ण करण्यासाठी 100 मेगावॅट एवढी वीज पवन ऊर्जा प्रकल्पातून खरेदी करण्यासाठी 23 फेब्रुवारी 2021 रोजी टेंडर मागवले होते. त्यानुसार जवळपास 99.60 मेगावॅट वीज 3 रुपये 27 पैसे दराने पुरवण्याबाबत टेंडर आले होते. त्यामुळे सदरच्या वीज दराला परवानगी मिळावी म्हणून टाटा पॉवरने वीज आयोगाकडे याचिका दाखल केली होती. मात्र पवन ऊर्जा प्रतियुनिट कमीत कमी 2 रुपये 25 पैसे तर जास्तीत जास्त 2 रुपये 52 पैसे एवढय़ा दराने मिळायला हवी.
टाटा पॉवरने मागवलेल्या टेंडरमधून 3.27 रुपये ही जी किंमत आली आहे त्यावरून पंपनीने स्पर्धात्मक निविदा मागवताना केंद्रीय ऊर्जा विभागाने दिलेल्या निर्देशांचे योग्य पालन केले नसल्याचे दिसत असल्याचे आयोगाने स्पष्ट केले आहे.





























































