पवना धरणात बुडून मुंबईतील दोन तरुणांचा मृत्यू

830

मावळ तालुक्यातील पवना धरण परिसरात पर्यटनासाठी आलेल्या मुंबईतील दोन तरुणांचा रविवारी धरणात बुडून मृत्यू झाला. अमेय दिलीप रहाटे (25) आणि तेजस रवी पांगम (22, दोघे रा. काळा चौकी, मुंबई) अशी मृत्युमुखी पडलेल्या तरुणांची नावे आहेत.

अमेय, तेजस आणि त्यांच्या बरोबर असलेले दोन मित्र रविवारी सुट्टी असल्याने मावळातील पवना धरण परिसरात पर्यटनासाठी आले होते. चौघेजण दुपारी एकच्या सुमारास पवना धरण परिसरातील ब्राह्मणोली गाव परिसरात फिरायला गेले होते. त्यावेळी चौघेजण पवना धरणात पोहोण्यासाठी उतरले. अमेय आणि तेजस यांना पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्याने दोघेजण बुडाले. त्यावेळी त्यांच्या बरोबर असलेल्या दोन मित्रांनी त्यांना वाचविण्याचा प्रयत्न केला.

या घटनेची माहिती मित्रांनी स्थानिकांना दिली. त्यानंतर पाण्यात बुडालेल्या अमेय आणि तेजस यांना स्थानिक रहिवाशांनी पाण्यातून बाहेर काढले. दोघांना तातडीने सोमाटणे येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारांपूर्वीच दोघांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले, अशी माहिती लोणावळा ग्रामीण पोलिसांनी दिली. दरम्यान, या प्रकरणी पोलिसांनी अकस्मात मृत्यू अशी नोंद केली आहे. पोलीस हवालदार बाबर तपास करत आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या