एमसीए प्रेसिडेंट चषकावर पय्याडेचे नाव

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मध्यमगती गोलंदाज सौरभ सिंगचा (34 धावांत 5 विकेट) प्रभावी मारा आणि धडाकेबाज सलामीवीर मुशीर खानच्या  (87  धावा) सर्वोत्तम खेळीच्या जोरावर व्हिक्टरी क्रिकेट क्लबवर नऊ विकेट्स राखून विजय मिळवताना पय्याडे स्पोर्ट्स क्लबने एमसीए प्रेसिडेंट चषकावर आपले नाव कोरले.

बीकेसी येथे खेळल्या गेलेल्या अंतिम सामन्यात शनिवारी रात्री प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेताना पय्याडेच्या गोलंदाजांना सुरुवातीला प्रभाव पाडता आला नाही. व्हिक्टरी सीसीने 7 षटकांत 73 धावा केल्या. सौरभ सिंगने जय बिस्ताला (52 धावा) बाद करून सलामी फोडली. त्यानंतर आणखी चार विकेट घेत व्हिक्टरी सीसीचा डाव 20 षटकांत 186 धावांवर रोखला. जयनंतर शास्वत जगताप (39), आयुष झिमारे (34), सूरज शिंदेने (24 धावा) संघाला दोनशेच्या घरात नेण्यात खारीचा वाटा उचलला.

पय्याडे एससीने 190 धावांचे विजयी लक्ष्य 20 षटकांत अवघ्या एका विकेटच्या बदल्यात पार केले. त्यात मुशीर खानने मोलाचे योगदान दिले. त्याच्या 37 चेंडूतील 87 धावांच्या खेळीत 11 चौकार आणि 6 उत्तुंग षटकारांचा समावेश आहे. भूपेन लालवानीने 40 चेंडूंत 60 आणि प्रसाद पवारने 26 चेंडूंमध्ये 41 धावा काढताना विजयावर शिक्कामोर्तब केले.