खेळाडूंशी गैरवर्तन झाल्याची पीसीबीची तक्रार, पत्रकार आणि क्रिकेटप्रेमींना व्हिसा न मिळाल्याबद्दल नाराजी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सध्या सुरू असलेल्या क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत हिंदुस्थानी संघाने पाकिस्तानी संघाचा आगदी सहजपणे पराभव केला. हा सामना अत्यंत चुरशीचा होईल अशी शक्यता होती मात्र प्रत्यक्षात हा सामना एकतर्फी झाला. या स्पर्धेसाठी हिंदुस्थानात आलेल्या पाकिस्तानी संघाचे फुलं उधळत , नाचत-गात स्वागत करण्यात आलं होतं. तरीही पाकिस्तानी क्रिकेट बोर्ड नाराज झाला आहे. पीसीबीने आंतरराष्ट्रीय क्रिकेट समिती अर्थात आयसीसीकडे तक्रार केली आहे. हिंदुस्थानविरूद्धच्या सामन्यात अहमदाबादमधील मैदानात पाकिस्तानी क्रिकेटपटूंच्या विरोधात प्रेक्षक घोषणाबाजी करत होते. हिंदुस्थानी प्रेक्षकांनी गैरवर्तन केल्याचा आरोप करत पीसीबीने आयसीसीकडे तक्रार केली आहे.

ट्विटरच्या माध्यमातून PCB ने ICC कडे तक्रारींचा पाढाच वाचला.  PCB चे असे म्हणणे आहे की “पाकिस्तानी पत्रकारांना विसा मिळवण्यासाठी बऱ्याच अडचणींचा सामना करावा लागला, तसेच पाकिस्तानी प्रेक्षकांना भारतात येण्यास परवानगी नाकरण्यात आली. 14 ऑक्टोबरला पार पडलेल्या भारत-पाकिस्तान सामन्यात आमच्या खेळांडूसोबत गैरव्यवहार करण्यात आला.

पाकिस्तानी क्रिकेटरसिकांना व्हिसा न मिळाल्याने मैदानात हिंदुस्थानी प्रेक्षकांची संख्या अधिक होती.  अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर 14 ऑक्टोबर 2023 रोजी पार पडलेल्या भारत-पाकिस्तान या हाय व्होल्टेज सामन्यात बाबर आजम आणि रिझवानला प्रेक्षकांच्या रोषाला सामोरे जावे लगले होते. मोहम्मद रिझवान जेव्हा आऊट झाला तेव्हा उत्साहाच्या भरात काही प्रेक्षकांनी “जय श्री रामची” घोषणाबाजी केली.  टॉस उडवल्यानंतर पाकिस्तानी क्रिकेट संघाचा कर्णधार बाबर आजम प्रतिक्रिया देत असताना प्रेक्षकांनी घोषणाबाजीने स्टेडियम दणाणून सोडलं होतं.  या घटनांबद्दल नाराजी व्यक्त करत पीसीबीने आयसीसीकडे तक्रार केली आहे.