
पेगॅसस हेरगिरीच्या चौकशीसाठी विरोधी पक्षांनी लावून धरलेल्या मागणीला आता एनडीए सरकारमध्ये घटक पक्ष असलेल्या जेडीयूचे नेते नितीश कुमार यांनीही पाठिंबा दिला आहे. पेगॅसस प्रकरणाची सखोल चौकशी झालीच पाहिजे, यामागील सत्य समोर आलेच पाहिजे, अशी सडेतोड भूमिका नितीश कुमार यांनी सोमवारी मांडली. त्यांची ही भूमिका म्हणजे मोदी सरकारला मोठा झटका मानला जात आहे.
नितीश कुमार यांनी याआधीही फोन टॅपिंगबाबत चिंता व्यक्त केली आहे. त्यानंतर आता त्यांनी हेरगिरीप्रकरणी सखोल चौकशीच्या मागणीचे समर्थन केले आहे. सोमवारी पत्रकारांनी त्यांना याबाबत प्रश्न केला. त्यावर ते म्हणाले, याची चौकशी झालीच पाहिजे. अनेक दिवसांपासून फोन टॅपिंगची प्रकरणे समोर येत आहेत. यावर अवश्य चर्चा झाली पाहिजे.
आम्ही तर पहिल्याच दिवशी ही भूमिका घेतली होती. आजकाल या सगळ्या गोष्टी कोण कशा प्रकारे करेल याचा अंदाज लागत नाही. यावर एकेक मुद्दा बघून योग्य ती पावले उचलली पाहिजेत, पण झालेय काय तर काहीच नाही. संसदेत काही लोक बोलताहेत व वृत्तपत्रांमध्ये येत आहे तेच आम्ही पाहतोय. जे काही आहे त्याची सखोल चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी नितीश कुमार यांनी केली आहे.




























































