राजेश प्रधान । पेण
काही दिवसांवर येऊन ठेपलेल्या गणेशोत्सवासाठी पेण तालुक्यांतील कारखान्यात गणेशाच्या मूर्ती आकार घेऊ लागल्या आहेत. सध्या रंगरंगोटीचे काम अंतिम टप्प्यात आहे. परदेशात पाठवायच्या मूर्ती तयार होऊन रवानाही झाल्या आहेत. यावर्षी अमेरिका, इंग्लंंड, ऑस्ट्रेलिया आणि मॉरिशससह अनेक देशात 12 ते 14 हजार गणेशमूर्ती पाठवण्यात आल्या आहेत.
गणेशमूर्तिकारांचे गाव म्हणून प्रसिद्ध असणाऱ्या पेणमधून यावर्षी जवळपास 30 लाख गणेशमूर्ती देशभरासह परदेशात पाठवण्यात येतात. कच्च्या मालाच्या किंमती आणि कामगारांची मजुरी वाढल्याने गणेशमूर्तीच्या किंमती गेल्या वर्षीच्या तुलनेत 25 टक्क्यांनी वाढ झाली आहे.
डोळ्यांची सुबक आखणी आकर्षक रंगसंगती आणि देखणी मूर्ती हे पेणमधील गणेशमूर्तीचे वैशिष्टय़ आहे. त्यामुळे पेणच्या गणपतींच्या मूर्तीना केवळ महाराष्ट्रातच नव्हे तर देशविदेशातूनही मागणी वाढत आहे. पूर्वी पेण शहरापुरता मर्यादित असणारा हा व्यवसाय आज तालुक्यातील विविध भागांत मोठय़ा प्रमाणात पसरला आहे.
यंदा किमतीत 25 टक्क्यांनी वाढ
पेण शहर व तालुक्यातील कारखान्यांत गणेशमूर्ती बनवण्याचे काम वर्षभर सुरू असते. यातून 30 ते 35 हजार लोकांना रोजगार मिळतो. या व्यवसायातून दरवर्षी साधारणपणे 70 ते 80 कोटींची वार्षिक उलाढाल होते. गणेशभक्तांचा कल आणि मागणी लक्षात घेऊन दरवर्षी नवीन प्रकारच्या गणेशमूर्ती तयार केल्या जातात. चित्रपट, मालिका यांचा विशेष प्रभाव मूर्ती निर्मितीत दिसतो. बाहुबली, जय मल्हार अशा विविध रूपांतील गणेशमूर्ती चांगल्याच गाजल्या होत्या. यावर्षीही पेण मध्ये 200 हून अधिक विविध प्रकारच्या गणेशमूर्ती तयार करण्यात आल्या. या गणेशमूर्ती महाराष्ट्रासह, कर्नाटक, गुजरात, गोवा, आंध्र प्रदेश यांसारख्या राज्यांतही रवाना करण्यात आल्या आहेत. काथ्या, शाडूची माती, रंग आणि कामगारांची मजुरी तसेच जीएसटी वाढल्याने यावर्षी गणेशमूर्तीच्या किमतीत साधारणपणे 25 टक्क्यांची वाढ झाली आहे.
शाडू मातीच्या ईकोफ्रेंडली गणेशमूर्तीना अधिक मागणी
गणेश भक्तांही पर्यावरण संवर्धनासाठी तयार असुन शाडू मातीच्या व नैसर्गिक रंगांपासून तयार करण्यात आलेल्या गणेश मुर्तीना चांगलीच मागणी वाढली असून विसर्जना नंतर सदरच्या बाप्पाच्या मूर्ती पाण्यात सहजपणे विरघळून जातात पिओपिच्या मुर्ती सारखे पर्यावरणाला मारक ठरत नाही त्यामुळे गणेश भक्त ईकोफ्रेंडली गणेशमूर्तीना प्राधान्य देत आहेत. पिओपिच्या गणेश मूर्तींपेक्षा ईकोफ्रेंडली गणेशमूर्ती थोडे महाग असल्यातरी गणेश भक्त ईकोफ्रेंडली गणेशमूर्तींचीच मागणी करीत आहेत.

























































