तुरुंगातील कैदी विचारतात आमच्या जामीन अर्जाचे काय होते? प्रलंबित खटल्यांवरून हायकोर्टाची नाराजी 

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

न्यायालयात वर्षानुवर्षे प्रलंबित चालणाऱ्या खटल्यांमुळे कैद्यांना तुरुंगात खितपत पडावे लागते. कैद्यांचे वकीलच वारंवार स्थगितीसाठी वेळ मागत असल्याचे पाहून मुंबई उच्च न्यायालयाने आज यावर तीव्र नाराजी व्यक्त केली. तुरुंगात भेट दिली असता तेथील कैदी आम्हाला विचारतात, आमच्या जामीन अर्जाचे पुढे नेमके काय होते, खटले का रखडतात. या दिरंगाईसाठी अनेक वेळा न्यायपालिकेला दोष दिला जातो, अशा शब्दांत न्यायमूर्तींनी खंत व्यक्त केली.

एका खटल्याच्या जामिन अर्जावर न्यायमूर्ती एस. एस. शिंदे आणि न्यायमूर्ती सारंग कोतवाल यांच्या खंडपीठासमोर सुनावणी ठेवण्यात आली होती. त्यावेळी आरोपीच्या वकिलांनी याचिकेवरील सुनावणी पुढे ढकलण्याची विनंती खंडपीठाला केली. सरकारच्या वतीनेही सुनावणीला तूर्तास स्थगिती देण्याची विनंती करण्यात आली. यावर न्यायमूर्तींनी नाराजी व्यक्त करत याचिकाकर्त्यांच्या वकिलांना सुनावले. न्यायमूर्ती म्हणाले की, न्यायालयात अनेक खटले प्रलंबित आहेत, जामिनाचे खटले पेंडिंग आहेत. या खटल्याची वेळेवर सुनावणी न होणे ही हिंदुस्थानच्या न्यायव्यवस्थेची कायमची समस्या असून अनेकवेळेस अंडर ट्रायल कैद्याला वर्षानुवर्षे तुरुंगात राहावे लागते यासाठी आम्हाला म्हणजेच न्यायपालिकेला दोषी ठरवले जाते. एवढेच नव्हे तर न्यायमूर्ती शिंदे म्हणाले, आम्ही एकदा तुरुंगात भेट दिली असता तेथील कैदी आम्हाला विचारतात की, आमच्या जामीन अर्जाचे पुढे काय होते? मुळात वकीलच सुनावणीला स्थगिती मागतात त्यामुळे खटले रखडत असल्याचेही न्यायमूर्ती म्हणाले.