
सामना प्रतिनिधी । मालवण
जोपर्यंत जवळचा पर्यायी मार्ग सुस्थितीत उपल्बध करून दिला जात नाही तोपर्यंत दुरुस्ती सुरू असलेल्या कोळंब (मालवण) पुलावरून पूर्णपणे वाहतूक बंद करण्यास ग्रामस्थांचा विरोध राहील. तरीही सार्वजनिक बांधकाम विभागाने हुकूमशाही पद्धतीने पूल वाहतुकीस बंद केल्यास जनआंदोलन करण्याचा इशारा कोळंब, सर्जेकोट ग्रामस्थांनी दिला आहे. कोळंब-मालवण येथील समर्थ मंगल सभागृहात कोळंब पूल पूर्णतः वाहतुकीस बंद होणार असल्याने त्यावर निर्णय घेण्याबाबत संघर्ष समितीची महत्वपूर्ण बैठक सोमवारी झाली. यावेळी समितीचे अध्यक्ष गोपी तांडेल, सभापती सोनाली कोदे, सरपंच प्रतिमा भोजने, अभियंता प्रकाश चव्हाण, प्रकल्प व्यवस्थापक सुमित शर्मा, ग्रामसेवक सागर देसाई यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी संघर्ष समितीचे पदाधिकारी आणि ग्रामस्थांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना पूल दुरुस्तीस झालेल्या विलंबाबाबत जाब विचारला. पूल दुरुस्तीचे काम हाती घेतले तेव्हा पर्यायी रस्त्याची मागणी ग्रामस्थांनी केली होती. मात्र लोकप्रतिनिधींनी पाठ फिरवल्याने व बांधकाम विभागाने हस्तक्षेप केल्याने पर्यायी मार्ग होऊ शकला नाही, असा आरोप ग्रामस्थांनी केला. तर आडारी या पर्यायी रस्त्यासाठी तत्कालीन जिल्हाधिकाऱ्यांनी मंजूर केलेल्या 50 लाख रुपयांच्या निधीचे काय झाले, असा सवाल संदीप भोजने यांनी केला. यावर अधिकाऱ्यांनी या रस्त्यालगत कांदळवन असल्याचे सांगितले.
… तर जनआंदोलन करू
पर्यायी रस्ता उपलब्ध करून न देता पूल दुरुस्तीसाठी वाहतूक पर्यायी मार्गावरून वळविण्यात आली, तर बांधकाम विभागाच्या कार्यालयावर मोर्चा काढून जनआंदोलन करू, असे गोपीनाथ तांडेल यांनी सांगितले. पूल दुरुस्ती करण्यास दोन महिन्याचा कालावधी लागणार आहे. त्यामुळे ग्रामस्थांच्या सोयीसाठी तसेच विद्यार्थ्यांचे नुकसान टाळण्यासाठी पर्यायी मार्गाची डागडुजी करून पूल दुरुस्तीच्या कामाला सुरुवात केली जावी. बांधकाम विभाग किंवा ठेकेदाराने हुकूमशाही पद्धतीने पुलाचे काम सुरू केल्यास जनभावनांचा उद्रेक होईल, असे कृष्णनाथ तांडेल यांनी सांगितले.
कोळंब पूल धोकादायक
संघर्ष समितीच्या माध्यमातून पर्यायी रस्त्याची डागडुजी करण्यासाठी शासनाकडून निधी मंजूर करून घेऊ. कोळंब पूल धोकादायक स्थितीत आहे. त्यामुळे खबरदारी घेणे आवश्यक आहे, असे मत बांधकामाचे अधिकारी चव्हाण व दाणे यांनी व्यक्त केले. त्यावर पर्यायी रस्त्याची व्यवस्था होईपर्यंत पूल दुरुस्तीच्या कामाला सुरुवात होऊ नये, अन्यथा संघर्ष अटळ आहे, अशी भूमिका ग्रामस्थांनी घेतली.
पालकमंत्री दीपक केसरकर यांची भेट घेणार
कोळंब पूल वाहतुकीस बंद झाल्यानंतर ओझर कातवड हा लांब पल्ल्याचा मार्ग आहे. या मार्गावरून अवजड वाहतूक करणे धोक्याचे आहे. शिवाय हा मार्ग निर्जन वस्तीचा असल्याने महिला तसेच विद्यार्थ्यांसाठी धोक्याचा आहे. त्यामुळे कोळंब गावाला जोडणाऱ्या आडारी व निव्हे येथून पर्यायी मार्गावर शासनाने खर्च करावा, अशी मागणी करण्यात आली. जिल्हा नियोजनमधून या पर्यायी मार्गासाठी निधी तातडीने मंजूर करण्यात यावा, यासाठी संघर्ष समिती पालकमंत्री दीपक केसरकर यांची भेट घेणार असे स्पष्ट करण्यात आले.





























































