
राज्यातील ‘ईडी’ सरकार जाणार. उद्या बुधवारी होणारी मंत्रिमंडळ बैठक कदाचित या सरकारची शेवटची बैठक असेल, अशी चर्चा सर्वत्र होत असतानाच मंत्रालयात सोमवारच्या तुलनेत मंगळवारी अभ्यागतांची मोठी गर्दी उसळली. मंत्रालय प्रवेशाच्या पाससाठी भर उन्हात भल्यामोठय़ा रांगा लागल्या होत्या. त्यात सामान्यांप्रमाणेच अनेक दलालांनीही आज आपली कामे वाजवून घेण्यासाठी मंत्रालय गाठल्याचे बोलले जात आहे. विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे आणि काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी याबाबत गंभीर आरोप केला आहे.
सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर राज्यातील ‘ईडी’ सरकार जाणार अशी चर्चा गेल्या अनेक दिवसांपासून मंत्रालयात उघडपणे सुरू आहे. सध्याच्या राजकीय घडामोडी व टीव्हीवर दिवसभर सुरू असलेल्या बातम्यांमुळे हे सरकार खरोखरच जाणार, अशी चर्चा सर्वसामान्यांमध्येही सुरू झाली आहे. त्यामुळे या सरकारकडून शेवटच्या क्षणी कामे मार्गी लावण्यासाठी राज्याच्या वेगवेगळ्या भागांतून लोकांनी मंत्रालयाकडे धाव घेतली. त्याचबरोबर आपली सेटिंगची कामे वाजवण्यासाठी अनेक दलालही आज मंत्रालयात ठाण मांडून होते, असे बोलले जात आहे.
बदल्यांच्या कामांसाठी मंत्रालयात येणाऱयांची संख्या मोठी आहे. मोक्याच्या जागी किंवा घराच्या जवळ नियुक्ती मिळण्यासाठी सध्या अनेक जण मंत्रालयाच्या चकरा मारत आहेत. हे सरकार जाण्यापूर्वी बदलीच्या अर्जावर सह्या करून घेण्यासाठी अनेकांनी आज थेट मंत्रालय गाठले.
गर्दी दुप्पट वाढली
आकाशवाणीसमोरच्या खिडकीवर मंत्रालयाच्या प्रवेशाचे पास मिळवण्यासाठी रांगा लागल्याचे चित्र आज पहायला मिळाले. सोमवारी मंत्रालयात अंदाजे दोन ते सव्वा दोन हजार व्हिजिटर्सची नोंद झाली, मात्र आज चार हजारांच्या आसपास व्हिजिटर्सची नोंद झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. उद्या कॅबिनेटच्या दिवशी तर हा आकडा अधिकच वाढण्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे.
अर्थपूर्ण फायली मार्गी लावण्यासाठी धावाधाव ः पटोले
सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर हे घटनाबाह्य सरकार जाणार आहे. त्यामुळे प्रलंबित कामे मार्गी लावण्यासाठी लगबग सुरू आहे. कायदेशीर-बेकायदेशीर पद्धतीने कामे मार्गी लावण्याचे प्रकार सुरू आहेत. नियम-कायदे धाब्यावर बसवले जात आहेत. शिंदे गटाच्या अर्थपूर्ण फायली मार्गी लावण्याची कामे सुरू आहेत, असा गंभीर आरोप काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला.
भर अब्दुल्ला गुड थैली में… : दानवे
विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनीही वाढलेल्या गर्दीवरून शंका घेतली. हे सरकार स्थिर नाही हे स्पष्टच आहे. सध्या अर्थपूर्ण पद्धतीने कामे केली जात आहेत. ‘भर अब्दुल्ला गुड थैली में’ अशा रीतीने हे सरकार चालले आहे, असे दानवे म्हणाले.

























































