
मुंबई मराठी माणसाच्या हाती राहू नये म्हणून केंद्रीय निवडणूक आयोगाची भाजपला मदत करतंय का? असा संशय शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते, खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केला. तसेच ज्या लोकांनी शरद पवार यांना 160 जागा जिंकवून देण्याची ऑफर दिली होती तीच लोकं उद्धव ठाकरेंनाही भेटली होती आणि त्यांनी काही जागा जिंकवून देण्याचीही ऑफर दिली होती असा गौप्यस्फोटही संजय राऊत यांनी केला.
मुंबईत पत्रकारांशी बोलताना संजय राऊत म्हणाले की, मिंधे, फडणवीस आणि अजित पवार यांच्या महायुतीचे जे घोटाळे आहेत, त्यांचं राज्य लुटण्याचे जे षडयंत्र आहेत, त्यांचे जे कलंकित मंत्री आहेत. हनी ट्रॅप प्रकरण असे अनेक घोटाळ्यांचे हे सरकार आहे. आणि या सरकारविरोधात राज्यपालांपासून ते विधीमडळापर्यंत अनेकदा आवाज उठवूनसुद्धा फडणवीस आणि या सरकारचे दिल्लीतले बाप मोदी शहा हे ऐकायला तयार नाहीत. आणि महाराष्ट्र सरकारला लुटणाऱ्या या दगाबाज सरकारला पाठीशी घालत आहेत. त्यामुळे लोकांसमोर जाऊन, आंदोलनाच्या माध्यमातून जागृती करणे हा आमच्याकडे एकमेव पर्याय आहे. उद्या शिवसेनेतर्फे महाराष्ट्राच्या सर्व जिल्ह्यामध्ये या घोटाळेबाज सरकार विरोधात आंदोलन होईल. स्वतः उद्धव ठाकरे दादरमध्ये आंदोलनात सहभागी होणार आहेत. त्यानंतर उद्या दिल्लीत एक महत्त्वाचे आंदोलन आहे. हे आंदोलन इंडिया आघाडीकडून होणार आहे. उद्या विरोधी पक्षाचे सर्व खासदार निवडणूक आयोगावर मोर्चा काढणार आहे. निवडणूक आयोगाने ज्या पद्धतीने घोटाळे केले आहेत आणि घोटाळे करणाऱ्यांना पाठीशी घातले आहे, राहुल गांधी यांनी पुराव्यासकट निवडणूक आयोगाचा एवढा मोठा भ्रष्टाचार बाहेर काढला आहे, आमचा निवडणूक आयोग राहुल गांधींना सांगत आहे की तुम्ही शपथपत्र द्या, याला काय म्हणावं? राहुल गांधी हे लोकसभेचे विरोधीपक्षनेते आहेत. राहुल गांधी जबाबादारीने बोलतात, त्यांनी त्यावर संशोधन केले आहे. आणि ते पुराव्यासहित बोलले आहेत. राहुल गांधींनी मतं चोरीचे पुरावे समोर ठेवले आहेत त्याचा शहानिशा अनेक पत्रकारांनी आणि वृत्तपत्रांनी केली आहे. तरीही निवडणूक आयोग पुरावे मागत असेल तर त्यांनी डोळ्यावर पट्टी बांधलेली आहे आणि त्यांच्या तोंडात बोळा कोंबलेला आहे हे मला स्पष्ट दिसतंय. अशा निवडणूक आयोगाच्या विरोधात इंडिया आघाडी लाँग मार्च काढणार आहे. मतदान आम्ही ज्याला करत आहोत त्याला ते गेलंय की नाही, या साठी व्हीव्हीपॅटची घोषणा ही सर्वोच्च न्यायालयाच्या माध्यमातून गेली आहे. आणि आता निवडणूक आयोग म्हणतंय की आता आम्ही व्हीव्हीपॅटही आम्ही दाखवणार नाही. म्हणजे आम्ही मत दिल्यावर ते कुणाला गेलंय हे आम्हाला कधीच कळणार नाही. मी दिलेलं मत कुणाला गेलं आहे हे जाणून घेण्याचा अधिकार मला संविधानाने दिला आहे. निवडणूक आयोागमध्ये निवडणूक प्रक्रियेचे इतके घोटाळे आहेत की, मोदी शहा फडणवीस यांच्यासारखे लोक संपूर्ण निवडणूक ही पैश्यांच्या जोरावर चोरतात आणि हायजॅक करतात. त्या पद्धतीचे एजंट त्यांनी निर्माण केले आहे. काल शरद पवार यांनी जो विषय मांडला की निवडणुकीपूर्वी त्यांना काही लोक भेटले आणि 160 जागा मिळवून देतो विशिष्ट रक्कम द्या अशी मागणी केली. आता त्याही पुढे जाऊन मी सांगतो या पैकी काही लोक उद्धव ठाकरेंनाही भेटलेले आहेत. हे लोक लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीलाही भेटले होते. आम्ही त्यांना सांगितले की आमचा लोकशाहीवर विश्वास आहे. देशातले वातावरण पाहता लोकसभा आम्ही 100 टक्के जिंकू आणि खरोखर महाराष्ट्रात आम्ही ते यश प्राप्त केलं. त्यामुळे निवडणुकीत अशा प्रकारे घोटाळे करून आम्हाला जिंकायची गरज नाही. विधानसभा निवडणुकीपूर्वी ते लोक परत आले. आम्ही त्यांना सांगितलं की लोकसभेत आमचा विजय झाला आहे. विधानसभेत आम्ही नक्की जिंकू. ते लोक म्हणाले की तुमच्या ज्या 60 ते 65 जागा अडचणीच्या आहेत त्या सांगा त्या आम्ही तुम्हाला विजयी करून देऊ ईव्हीएमच्या माध्यमातून. आम्ही त्यांना सांगितले की आम्हाला त्याची गरज वाटत नाही. पण त्यांनी इतकंही सांगितलं की तुम्हाला जरी हे आवश्यक वाटत नाही तरी समोर जे सरकारमध्ये आहे त्यांनी अशा प्रकारची योजना ईव्हीएमच्या माध्यमातून आणि मतदारयाद्यांच्या माध्यमातून जे काम केलं आहे त्यामुळे तुमचं अपयश आम्हाला दिसतंय, त्यामुळे आम्ही तुम्हाला मदत करू शकतो. तरी आमचा विश्वास निवडणूक यंत्रणेवर, निवडणूक आयोगावर आणि लोकशाहीवर होता. दुर्दैवाने जे शरद पवार म्हणत आहेत आणि उद्धव ठाकरेंना जी माणसं भेटली त्यांच्या बोलण्यात तथ्य असावं असं दिसतंय. राहुल गांधींनी जे पुरावे दिले त्याची चौकशी व्हायला पाहिजे. ईव्हीएममध्ये घोटाळे करून तुरुंगवास होण्याची शक्यता काही लोक व्यक्त करत आहेत, त्यात आता व्हीव्हीपॅटची योजना दूर केली याचा अर्थ निवडणुकीची यंत्रणा स्वच्छ नाही ही यंत्रणा घोटाळेबाजांना पाठीशी घातले. निवडणूक यंत्रणा पारदर्शक नाही हे स्पष्ट दिसत आहे असे संजय राऊत म्हणाले.
आम्ही आतापासून लोकांना जागरूक करण्याचा प्रयत्न करत आहोत. मुंबई महानगरपालिका ही परंपरेने शिवसेनेच्या आणि मराठी माणसाच्या ताब्यात आहेत. त्या राहू नयेत म्हणून भारताचा निवडणूक आयोगही प्रयत्न करतोय का भाजपला मदत करण्यासाठी? मुंबई मराठी माणसाच्या हाती राहू नये म्हणून निवडणूक आयोग यासाठी काही विशेष प्रयत्न करतोय. आणि त्याचाच भाग म्हणून व्हीव्हीपॅटची योजना ही रद्द करून एकतर्फी निवडणूक व्हावी यासाठी काही लक्षण दिसतंय का यासंदर्भात आम्ही सतत चर्चा करत आहोत असेही संजय राऊत म्हणाले.
जैन समाज हा परंपरेने अहिंसक मानला जातो. त्यांच्या हातात चाकू आणि शस्त्र असतील आणि ती जर अशा प्रकारे आक्रमक आणि हिंसक होत असतील तर हा त्यांच्या धर्मांचा आणि भगवान महावीरांचा विचार ते पाळत नाही, याचे कारण या समजाला हिंसक बनवण्याचे का भाजप करतोय. मोदी आणि शहा यांच्यामुळेच हा समाज आपल्या विचारापासून दूर जाताना दिसतोय.
या देशाचे उपराष्ट्रपती 21 जुलैपासून बेपत्ता आहेत. या देशाच्या उपराष्ट्रपतीपदी असलेली व्यक्ती जी राज्यसभेची सभापती आहेत. 21 जुलैला सकाळी ते राज्यसभेत आले, त्यांची आणि आमची चर्चा झाली, त्यांनी काही आदेश दिले राज्यसभेत. त्यानंतर सभागृह तहकूब झाले, त्यांची प्रकृती उत्तम होती. ते काही काळ चिडले असतील, त्यांनी काही काळ हास्यसंवाद केला. आणि संध्याकाळी अचानक सहा वाजता वृत्तवाहिन्यांवर बातमी झळकली धनखंड यांनी प्रकृतीकारणास्तव उपराष्ट्रपतीपदाचा राजीनामा दिला. ही बाब आमच्यासाठी अतिशय धक्कादायक होती. इथपर्यंत आम्ही समजू शकतो. पण धनखड यांनी राजीनामा दिल्यानंतर एकही दिवस ते कुठे आहेत त्यांच्या प्रकृतीची काय स्थिती आहे, त्यांचा मुक्काम कुणाकडे आहे ते बरे आहेत ना मुळात ते आहेत ना त्यांना कुणी गायब केलंय का या शंका आमच्या मनात येत आहेत. देशाचा उपराष्ट्रपती असा गायब झाला असेल आणि त्याचा ठावठिकाणा कुठे लागत नसेल तर देशाच्या लोकशाहीसाठी ही चिंतेची बाब आहे. अशा प्रकारे आपल्याला नको असेलेले नेते गायब करण्याची पद्धत चीन आणि रशियामध्ये आहे. तशी काही परंपरा या लोकांनी सुरू केली आहे का? उद्धव ठाकरे दिल्लीला आले असताना कपिल सिब्बल हे त्यांना भेटले आम्ही त्यावर चर्चा केली. Habeas corpus नावाची एक प्रक्रिया असते त्यानुसार एखादी व्यक्ती सापडत नसेल तर हायकोर्ट किंवा सुप्रीम कोर्टाच्या आदेशाने आम्ही शोधू शकतो. कदाचित अशी याचिका आम्ही करू शकतो अशी माहितीही संजय राऊत यांनी दिली.