नगरमध्ये चिमुरडीवर अत्याचार करणारा आरोपी दोषी, न्यायालय मंगळवारी शिक्षा ठोठावणार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
प्रातिनिधिक फोटो

 

सामना प्रतिनिधी ।  नगर

नगर शहरात चार वर्षाच्या चिमुरडीवर अत्याचार करून तिला रेल्वे पुलाजवळ टाकून दिल्याची घटना घडल्यामुळे एकच खळबळ उडाली होती. या प्रकरणात आरोपी बाळू बर्डे याला आज न्यायालयाने दोषी ठरविले. या प्रकरणाचा ७ ऑगस्टला निकाल लागणार आहे.

नगर येथील रेल्वे स्टेशनजवळ ९  डिसेंबर २०१६  रोजी चार वर्षाची बालिका बेवारस आढळून आली होती. या प्रकरणाची माहिती मिळाल्यानंतर कोतवाली पोलिस ठाण्याचे पथक तात्काळ घटनास्थळी दाखल झाले होते. त्यावेळी त्या बालिकेची परिस्थिती पाहता त्या चिमुरडीवर अत्याचार झाल्याचे लक्षात आले होते. कोतवालीचे तत्कालीन पोलीस निरिक्षक सोमनाथ मालकर यांनी तात्काळ आरोपींचा शोध घेण्याचे आदेश दिल्यानंतर विशेष चार पथक पोलिसांनी रवाना केली होती. तपासात पोलिसांना आरोपी हा राहुरी परिसरातील असल्याचा अंदाज आला होता. ज्या चिमुरडीवर अत्याचार झाला तिच्या आईवडिलांचा शोध सुध्दा पोलिसांनी घेतला होता. त्याची माहिती त्यांनी आईवडिलांना दिल्यानंतर ते दोघेही नगर येथे आले होते.

कोतवाली पोलिसांनी सहाय्यक पोलिस निरीक्षक संदीप पाटील तांत्रिक सहाय्य करणारे वृजेष गुजराथी आणि इतर सहकार्‍यांनी सुमारे २२ दिवस अथक परिश्रम घेऊन आरोपी बर्डे याच्या मुसक्या आवळल्या होत्या. संबंधित आरोपीचे रेखाचित्र त्यावेळी जारी केले होते. एका स्केचच्या आधारे राज्यभर पंचवीसहून अधिक रेल्वे स्थानकावर पोलिसांनी त्याचा शोध घेतला. आरोपीने कृत्य करून तो रेल्वेतून पसार झाल्याचेही समजले होते. एक जानेवारी २०१७ रोजी पहाटे आरोपीच्या मुसक्या आवळल्या. त्याचदरम्यान पिडीत मुलीला पुढील उपचारासाठी पुण्याच्या ससून रूग्णालयात दाखल केले होते. पोलिसांनी आरोपीचा छडा लावल्यानंतर आरोपी हा राहुरी तालुक्यातील असल्याचे समजले होते व त्याच्याकडे माहिती घेतल्यानंतर त्याने कृत्य केल्याची कबुली दिली होती.

नगर येथील न्यायालयात या प्रकरणाचा खटला जिल्हा व सत्र न्यायाधीश अशोककुमार भिलारे यांच्या समोर सुरू होता. सरकारी पक्षातर्फे अ‍ॅड. अर्जुन पवार यांनी न्यायालयात बाजू मांडली. १४ साक्षीदार तपासण्यात आले. न्यायालयाने दोन्ही बाजूचा युक्तीवाद ऐकल्यानंतर गुरूवारी याप्रकरणातील आरोपी बाळू बर्डे यास दोषी धरले आहे. मंगळवारी त्याच्या शिक्षेवर निकाल देण्यात येईल.