
डोक्यात दगड घालून ठार मारण्याचा प्रयत्न केल्याची घटना नगर तालुक्यातील टाकळी काझी येथे 21ऑक्टोंबर रोजी रात्री साडेदहाच्या सुमारास घडली. नगर जामखेड रोडवरील टाकळी काझी येथील पेट्रोलपंपासमोर सुनिल पाचपुते यांचे चहा व नाष्ट्याचे दुकान आहे. 21 ऑक्टोबर रोजी नेहमीप्रमाणे ते रात्री दहाच्या सुमारास दुकान बंद करुन पत्र्याच्या शेडमध्ये झोपले असता साडेदहा ते अकरा वाजण्याच्या सुमारास तोंडाला रुमाल बांधून आलेल्या एका व्यक्तीचे पाचपुते यांच्या डोक्यात दगड मारुन त्यांना ठार करण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्या व्यक्तीच्या हातातून दगड खाली पडल्याने पाचपुते पळाले. त्यामुळे त्यांचा जीव वाचला. हा हल्ला चोरीच्या उद्देशाने झाला नसून जीवे मारण्याचा प्रयत्न केला असल्याचे पाचपुते कुटुंबीयांचा आरोप आहे. याबाबत नगर तालुका पोलीस ठाण्यात तक्रारीची नोंद केली आहे. मात्र या घटनेला दहा ते बारा दिवस उलटूनही कोणतीही कार्यवाही न झाल्याने पाचपुते कुटुंबीयांमध्ये भीतीचे वातावरण आहे. याबाबत तातडीने कार्यवाही न केल्यास कुटुंबासह उपोषणाला बसण्याचा इशारा पाचपुते यांनी दिला आहे.























































