
सामना ऑनलाईन । वसई
वसईत सिरिअल रेपिस्टची दहशत थांबते न थांबते तोच एका विकृताची पुन्हा दहशत पसरली आहे. हा विकृत तरूण लहान मुलींचा पाठलाग करून त्यांच्याशी अश्लील चाळे करतो. एकट्या अल्पवयीन मुलींना हेरून तो त्यांना लक्ष्य करतो. वसईच्या आनंद नगर परिसरात या विकृताने एका मुलीचा विनयभंग करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे वसई परिसरात पालकांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले असून, या विकृताला लवकरात लवकर पकडण्याची मागणी होत आहे.
वसईच्या आनंद नगर परिसरात ट्युशन क्लासहून घरी जात असणाऱ्या एका मुलीला या विकृताने आपल्या वासनेची शिकार बनवण्याचा प्रयत्न केला. मात्र मुलीने आरडाओरडा केल्याने त्याने तेथून पळ काढला. पीडित मुलीचा पाठलाग करताना हा नराधम एका दुकानात लावलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. या प्रकरणी मुलीच्या पालकांनी वसईतील माणिकपूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. त्यामुळे या विकृताच्या लवकरात लवकर मुसक्या आवळाव्या अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. या प्रकरणी माणिकपूर पोलीस अधिक तपास करत आहेत.




























































