महिला खासदाराकडे पाहून अश्लील हावभाव केले, आरोपीला अटक

1140

तृणमूल काँग्रेस पक्षाच्या खासदार मिमी चक्रवर्ती यांच्याकडे पाहून अश्लील हावभाव करत घाणेरडी शेरेबाजी करणाऱ्या व्यक्तीला कोलकाता पोलिसांनी अटक केली आहे. मिमी या जिममधून परतत असताना हा प्रकार घडला आहे. खासदार आणि अभिनेत्री अशी मिमी यांची दुहेरी ओळख पश्चिम बंगालला आहे.

अभिनयाकडून राजकारणाकडे वळलेल्या मिमी चक्रवर्ती या सोमवारी जिममधून व्यायाम संपवून घराकडे निघाल्या होत्या त्यांच्या मागून येणारा टॅक्सीचालक सतत हॉर्न वाजवत होता. टॅक्सीने मिमी यांच्या गाडीला ओव्हरटेक केला. मिमी यांनी यावेळी त्यांच्या गाडीची काच खाली केली आणि कोण आहे ते पाहायला सुरुवात केली. यावेळी टॅक्सी चालकाने त्यांच्याकडे पाहून अश्लील हावभाव केले आणि घाणेरडी शेरेबाजीही केली. बल्लीगंज आणि गरियाहाट दरम्यान असलेल्या एका ट्रॅफिक सिग्नलजवळ हा सगळा प्रकार घडला होता.

संतापलेल्या मिमी यांनी टॅक्सीचालकाला अडवलं आणि गाडीतून उतरायला लावलं. टॅक्सीचालक गाडीतून उतरला आणि त्याने अश्लील हावभाव करत घाणेरडी शेरेबाजी करणं सुरूच ठेवलं होतं. मिमीने त्याला पोलिसांच्या ताब्यात देण्याचा इशारा दिला, ज्यानंतर तो पळून गेला. जेव्हा हा प्रकार घडला तेव्हा मिमीचा सुरक्षा रक्षक गाडीतच होता. तो पळून गेल्यानंतर मिमीने घडलेला प्रकार ट्रॅफिक हवालदाराला सांगितला होता. त्याच रात्री पोलिसांनी देवा यादव (32 वर्षे) या व्यक्तीला अटक केली. आनंदपूर पोलिसांनी त्याला शोधून काढत त्याच्या मुसक्या आवळल्या.

या प्रकाराबाबत बोलताना पोलीस अधिकाऱ्यांनी म्हटलंय की खासदाराच्या वाहनामागे हा टॅक्सीवाला सतत हॉर्न वाजवत फिरत होता. त्याने ओव्हरटेक करून खासदारासमोर घाणेरडे हावभाव केले यामुळे गरियाघाट पोलिसांनी त्याचा शोध सुरू केला होता. पोलिसांनी यादवला न्यायालयात हजर केलं असून त्याला 20 सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या