
सामना ऑनलाईन । काबूल
पेशावर शाळा हल्ला तसेच सामाजिक कार्यकर्ती मलाला युसुफझाईवर गोळी चालवणारा तालिबानी अतिरेकी मौलाना फजलुल्ला अमेरिकेच्या ड्रोनहल्ल्यात ठार झाला. व्हाईस ऑफ अमेरिकाने या घटनेची पुष्टी केली आहे. फजलुल्ला हा पाकिस्तानातील ‘तहरीक ए तालिबान’ या संघटनेचा प्रमुख होता.
पाकिस्तान-अफगाण सीमेवरील दुर्गम भागात मौलाना फजलुल्ला दडून बसल्याची माहिती मिळाल्यानंतर अमेरिकेने ड्रोनच्या मदतीने त्याचा ठावठिकाणा शोधला आणि हल्ला चढवला. या हल्ल्यात फजलुल्लासोबत आणखी काही अतिरेकी ठार झाल्याचे वृत्त आहे. फजलुल्लाच्या शिरावर अमेरिकेने ३४ कोटी रुपयांचे बक्षीस ठेवले होते. पाकिस्तानातील सामाजिक कार्यकर्ती मलाला युसुफझाई हिच्यावर २०१२ मध्ये करण्यात आलेल्या हल्ल्याचा मास्टरमाइंड फजलुल्लाच होता. त्याचबरोबर २०१४ मध्ये पेशावर येथे एका शाळेवर करण्यात आलेल्या आत्मघाती हल्ल्याचा कटही त्यानेच रचला होता. या हल्ल्यात १३० चिमुकल्यांचा मृत्यू झाला होता.



























































