दोघांवर पाळीव कुत्र्याचा हल्ला; कुत्र्याच्या मालकावर गुन्हा दाखल

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

फोटो आणि व्हिडीओ चित्रीकरण करण्यासाठी गेलेल्या एका फोटोग्राफर आणि त्याच्यासोबत असणाऱ्या कामगाराच्या अंगावर शेजारी राहणाऱ्या एकाने जाणीवपूर्वक घरातील कुत्रा सोडला. कुत्र्याने फोटोग्राफर आणि कामगाराचा चावा घेत त्यांना जखमी केले. ही घटना रविवारी दुपारी 1 वाजण्याच्या सुमारास रुणवाल पार्क, दिघी येथे घडली.

शुभम नरेश चौधरी (वय 19, रा. साई पार्क गणेश कॉलनी, दिघी), थावरा देविदास आडे (रा. गायकवाडनगर, दिघी) अशी जखमींची नावे आहेत. याबाबत शुभम यांनी दिघी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी गजेंद्र सिंहराणा (वय 60), सीमा राणा रावत (वय 35, दोघे रा. रुणवाल पार्क, दिघी) यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संदीप वाळके यांची दिघी येथील रुणवाल पार्क येथे जमीन आहे. त्या जमिनीचे फोटो आणि व्हिडिओ शूटिंग करण्यासाठी शुभम गेले होते. त्यावेळी तिथे जखमी थावरा आडे आणि गजानन राठोड हे दोघेजण काम करत होते. शुभम फोटो आणि शूटिंग करत असताना जवळच राहत असलेल्या आरोपींनी त्यांच्या डॉबरमॅन जातीच्या पाळीव कुत्र्याला जाणीवपूर्वक चावा घेण्याच्या उद्देशाने मोकळे सोडले. त्यानंतर कुत्र्याने शुभम आणि कामगार थावरा यांना चावा घेऊन जखमी केले. याप्रकरणी दिघी पोलीस अधिक तपास करीत आहेत.