
शीना बोरा हत्याकांडातील आरोपी पीटर मुखर्जी याला मुंबई उच्च न्यायालयाने आज तब्बल पाच वर्षांनंतर दिलासा दिला. या हत्या प्रकरणात पीटरचा सहभाग असल्याचे कोणतेही सबळ पुरावे प्रथमदर्शनी आढळून आलेले नाहीत असे स्पष्ट करत न्यायमूर्ती नितीन सांबरे यांनी दोन लाखांच्या जातमुचलक्यावर पीटरची सुटका केली. मात्र सीबीआयने सर्वोच्च न्यायालयात जाण्यासाठी सहा आठवडय़ांची स्थगिती मिळवली आहे. त्यामुळे पीटरचा मुक्काम तुरुंगातच राहणार आहे.
शीना बोरा हत्याकांडप्रकरणी आर्थर रोड तुरुंगात शिक्षा भोगत असलेल्या पीटर मुखर्जीची बायपास सर्जरी झाली असून छातीत दुखत असल्याने मुखर्जी याने सुटकेसाठी मुंबई उच्च न्यायालयात अर्ज दाखल केला होता. या अर्जावर न्यायमूर्ती नितीन सांबरे यांच्यासमोर सुनावणी घेण्यात आली. या हत्याकांडप्रसंगी पीटर मुखर्जी हिंदुस्थानात नव्हते, याशिवाय याचिकाकर्त्यांनी चार वर्षांपेक्षा जास्त काळ तुरुंगात शिक्षा भोगली असून त्यांची बायपास सर्जरी झाली आहे असे न्यायमूर्तींनी स्पष्ट केले व त्यांचा जामीन अर्ज स्वीकारला. हा अर्ज स्वीकारतानाच हायकोर्टाने पीटर यांना त्यांची मुले विधी आणि राहुल तसेच इतर साक्षीदारांची भेट न घेण्याचे आदेश दिले. याशिवाय पोलिसांकडे पासपोर्ट जमा करण्यास बजावले. दरम्यान, सीबीआयच्या वतीने पीटरच्या जामीन अर्जाला जोरदार विरोध करण्यात आला व या निर्णयाविरोधात सर्वोच्च न्यायालयात दाद मागण्यासाठी निर्णयाला स्थगिती देण्याची मागणी केली. हायकोर्टाने त्यास मंजुरी देत सहा आठवडय़ांची स्थगिती दिली.





























































