
कात्रज परिसरातील पेट्रोल पंपावर दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या टोळीला भारती विद्यापीठ पोलिसांनी अटक केले. त्यांच्याकडून शस्त्रे, मिरचीपूड, दोरी, बॅटरी जप्त करण्यात आली.
लिंबराज दत्तात्रय घोरपडे (वय २१), मोहसीन मोनीर शेख (वय २७), मेहबुब हुसेन शेख (वय २७), अदनान जाफर शेख (वय १९) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी सहायक पोलीस निरीक्षक दीपक मते यांनी फिर्याद दिली आहे.
भारती विद्यापीठ पोलीस पेट्रोलिंग करीत होते. त्यावेळी कात्रज परिसरातील पेट्रोल पंपावर दरोडा टाकण्याच्या तयारीत टोळी असल्याची थांबल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून चौघांना ताब्यात घेतले. चौकशीत त्यांनी दरोडा टाकणार असल्याची कबुली दिली. याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक समाधान मचाले तपास करीत आहेत.
































































