
जगभरात कोरोनाचा प्रकोप सुरूच आहे. त्यामुळे कोरोनावरील लस कधी येणार याची प्रतीक्षा आहे. ब्रिटनमध्ये कोरोनावरील फायझर लस नागरिकांना देण्यास या आठवड्यापासून सुरुवात होणार आहे. हिंदुस्थानातही 8 लसींवर काम सुरू असून लवकरच लस येण्याची शक्यता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केली आहे.
आता कोरोनालसीबाबत सकारात्मक बातमी आहे. आपत्कालीन परिस्थितीत हिंदुस्थानात कोरोना लसीला परवानगी देण्याची मागणी ब्रिटनमध्ये मंजुरी मिळालेल्या फायझर कंपनीने केली आहे. त्याला परवानगी मिळाल्यास फायझरची लसही हिंदुस्थानात येण्याची शक्यता आहे.
फायझर इंडियाने केंद्रीय औषध मानक नियंत्रण संस्थेकडे (डीसीजीआय) लसीच्या वापराबाबत परवानगी मागितली आहे. असा अर्ज करणारी फायझर इंडिया पहिली औषधनिर्माण कंपनी ठरली आहे. फायझर आणि बायोएनटेकने विकसित केलेल्या लसीच्या वापराला ब्रिटनने परवानगी दिली आहे. तसेच बहारिनमध्येही लसीच्या वापराला मंजूरी मिळाली आहे. त्यानंतर फायझरने केंद्र सरकारकडे लसीच्या वापराला परवानगी मागितली आहे.
लसीची आयात करण्याची, त्याचबरोबर देशभरात लसीची विक्री आणि वितरण करण्याची परवानगी फायझरने डीसीजीआयला केलेल्या अर्जात मागितली आहे. कंपनीने 4 डिसेंबरला याबाबतची परवानगी मागितली आहे.
याबाबतची परवानगी मिळाली तरी ही लस ठेवण्यासाठी उणे 70 अंश सेल्सियस तापमानाची गरज असते. त्यामुळे या लसीची आयात करून देशात त्याचे विचरण करणे हे मोठे आव्हान ठरणार आहे.




























































