
लॉकडाऊनच्या काळात अत्यावश्यक सेवेतील व्यक्तींना लोकल प्रवासाची मुभा देण्यात आली आहे. मेडिकल स्टोअर्सचा समावेश अत्यावश्यक सेवेत करण्यात आला आहे. पण मेडिकल स्टोअर्समध्ये काम करणाऱयांना अजूनही लोकलमध्ये प्रवेश दिला जात नाही. त्यामुळे औषध विक्रेत्यांमध्ये नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे.
मुंबईत लॉकडाऊनच्या काळात अत्यावश्यक सेवेतील नोकरदारांना लोकल ट्रेनमधून प्रवासाला मुभा देण्यात आली आहे. सरकारी कर्मचारी, बँक कर्मचारी, पालिकेतील कर्मचारी, रुग्णालयातील कर्मचारीवर्ग यांच्यासह आता डबेवाल्यांनाही लोकल प्रवासासाठी मुभा दिली आहे. पण कोरोनाच्या काळात जिवावर उदार होऊन औषध विक्री करणाऱया मेडिकल स्टोअर्समधील कर्मचाऱयांना लोकलने प्रवास करण्यास रेल्वे कर्मचारी मज्जाव करीत आहेत. लाँकडाऊनच्या काळात सर्व मंडया, दुकाने, मॉल, मोठी स्टोअर्स बंद ठेवण्यात आली होती. पण मेडिकल स्टोअर्स खुली ठेवण्यास परवानगी दिली होती. पुढे कालानंतराने अनलॉक करण्यास सुरुवात झाली. सर्व व्यवहार सुरळीत होऊ लागले. पण तरीही औषध विक्रेत्यांना रेल्वे स्टेशनमध्ये शिरण्यास मज्जाव केला जात आहे.
मुंबईत साडेसात हजार मेडिकल स्टोअर्स आहे. या दुकानांमध्ये काम करणारे मुंबईच्या उपनगरात राहतात. सध्याच्या कोरोनाच्या काळातही औषध विक्रीचा दुकाने सुरळीत सुरू आहे. ही दुकाने सुरू ठेवण्यासाठी कर्मचारी सार्वजनिक वाहनांमधून प्रवास करीत आहेत. त्यामध्ये औषध विक्रेत्यांचे कित्येक तास वाया जातात. औषधाच्या दुकानांमध्ये काम करणाऱयांपैकी बहुतांश कर्मचाऱयांकडे स्वतःचे वाहन नाही. दररोज टॅक्सी परवडत नाही. रेल्वेने फार्मा कंपन्यातील कर्मचाऱयांना लोकल प्रवासाला मुभा दिली आहे, पण तरीही लोकल प्रवासापासून वंचित ठेवण्यात आल्याचे दादरच्या सुश्रुषा मेडिकल स्टोअर्समधील दीपक काळे सांगतात.
पत्रकात काय म्हटले आहे…
पश्चिम रेल्वेच्या डीआरएम कार्यालयाने 5 सप्टेंबर 2020 रोजी जारी केलेल्या परिपत्रकात सरकारी तसेच खासगी रुग्णालये, पॅथॉलॉजी लॅब व फार्मा स्टाफला लोकलने प्रवासाला मुभा दिली आहे. फार्मा स्टाफमध्ये औषध विक्रेत्यांच्या दुकानांचा समावेश होते. मेडिकल स्टोअर्समध्ये काम करणाऱया कर्मचाऱयांनी पश्चिम रेल्वेच्या या परिपत्रकाची प्रत रेल्वेच्या कर्मचाऱयांना दाखवली, पण तरीही लोकल प्रवासाला परवानगी दिली जात नाही, अशी खंत औषधांच्या दुकानात काम करणारे कर्मचारी व्यक्त करीत आहेत.

























































