
हिंदुस्थानने एअरस्ट्राईक करून हादरवलेल्या पाकिस्तानने सोशल मीडियावर खोटय़ा बातम्यांचा प्रोपोगंडा सुरू केला आहे. पाकिस्तानने आपले फेकास्त्र वापरत फेक व्हिडीओ आणि फोटो व्हायरल करून दिशाभूल करायला सुरुवात केली आहे. प्रेस इन्फॉर्मेशन ब्युरोच्या ‘पीआयबी-फॅक्ट चेक’ने या खोटारडेपणाचा पर्दाफाश करत हिंदुस्थानींना सजग राहण्याचा इशारा दिला आहे. हिंदुस्थानी लष्कराने पाकिस्तानची एअर डिफेन्स सिस्टीम उद्ध्वस्त केली तेव्हापासून पाकिस्तानने खोटय़ा व्हिडीओ आणि फोटोंचा मारा सुरू केला आहे. याचा हिंदुस्थानने चांगलाच समाचार घेतला आहे. पीआयबीच्या फॅक्ट चेक युनिटने मोठी कारवाई करत सात व्हिडीओंची सच्चाई उघड केलीय.
फेक व्हिडीओ कोणते?
- सोशल मीडियावर जालंधर येथील ड्रोन हल्ल्याचा व्हिडीओ व्हायरल होतोय. पीआयबी
फॅक्ट चेकमध्ये असे दिसून आले की, हा व्हिडीओ एकदम खोटा आहे. हा व्हिडीओ शेतातील आगीचा फोटो आहे. - पाकिस्तानी लष्कराने हिंदुस्थानची चौकी उडवल्याचा एक व्हिडीओ व्हायरल होतोय. मात्र या व्हिडीओत सांगितल्याप्रमाणे ‘20 राज बटालियन’ या नावाची कोणतीही तुकडी अस्तित्वातच नसल्याचे तपासात आढळून आलेय.
- एका व्हायरल व्हिडीओच्या मदतीने पाकिस्तानने हिंदुस्थानवर मिसाईल सोडल्याचा दावा केला जातोय. मात्र हा व्हिडीओ 2020 मधील लेबनॉनमधील स्फोटाचा असल्याचे पीआयबीने सांगितलेय.
- राजौरीमध्ये हिंदुस्थानी जवानांवरील आत्मघातकी हल्ल्याचा व्हिडीओदेखील खोटा आहे.
- लष्करप्रमुख जनरल व्ही. के. नारायण यांच्या नावाने एक पत्र व्हायरल होतंय. मात्र अशा नावाचे कुणीही लष्करप्रमुख नसून ते पत्र फेक आहे.
- हिंदुस्थानी वायुदलाने आपल्याच नागरिकांवर हल्ला केला आहे. अशा खोटय़ा बातम्या व्हायरल होत आहेत.
हिंदुस्थान सरकारने देशभरातील सर्व विमानतळांवर प्रवेशबंदी केल्याचा दावा खोटा आहे.