‘छपाक’ विरोधातील याचिका निव्वळ पैसे उकळण्यासाठीच निर्मात्यांचे हायकोर्टात प्रतिज्ञापत्र

ऍसिड हल्याची शिकार झालेल्या मुलीची कथा सांगणारा छपाक हा चित्रपट सत्य घटनेवर आधारित आहे. त्यामुळे कोणीही कथा चोरल्याचा आरोप करू शकत नाही. निर्मात्यांची बदनामी करून त्यांच्याकडून पैसे उकळण्यासाठीच अशा प्रकारची निरर्थक याचिका हायकोर्टात दाखल करण्यात आल्याचा दावा चित्रपटाचे निर्माते आणि दिग्दर्शक मेघना गुलजार यांनी आज हायकोर्टात केला.

अभिनेत्री दीपिका पदुकोण हिची मुख्य भूमिका असलेला आणि फॉक्स स्टार स्टुडिओची निर्मिती असलेल्या या चित्रपटात ऍसिड हल्यामध्ये जखमी झालेल्या लक्ष्मी अगरवाल या तरुणीची कथा दाखविली गेली आहे. सिनेमाचे दिग्दर्शन मेघना गुलजार यांनी केले असून हा चित्रपट येत्या शुक्रवारी प्रदर्शित होत आहे. छपाकची मूळ संकल्पना आणि कथा ही आपली असून त्याबाबतची रितसर नोंदणी फेब्रुवारी 2015 साली  इंडियन मोशन पिक्चर्स असोसिएशनकडे (इंपा) करण्यात आली आहे.  आपण या चित्रपटाच्या निर्मिती साठी फॉक्स स्टार स्टुडिओशी चर्चा केली होती. मात्र काही कारणांमुळे हे काम अर्धवट राहिले आता याच पटकथेवर फॉक्स स्टारचा चित्रपट प्रदर्शित होत असल्याचे कळल्यावर संबंधितांकडे  याबाबत तक्रार केली, मात्र दाद न मिळाल्यामुळे लेखक राकेश भारती यांनी ऍड. अशोक सरोगी यांच्या मार्फत मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली.

निर्मात्यांनी लेखकांच्या यादीत आपल्याला ही समाविष्ट करावे अन्यथा चित्रपटाच्या प्रदर्शनावर स्थगिती आणावी,  आवश्यक वाटल्यास छपाक ची पटकथा आणि माझी पटकथा तज्ञांकडून तपासावी, असे याचिककर्त्यांचे म्हणणे आहे या याचिकेवर आज न्यायमूर्ती एस सी गुप्ते यांच्या समोर सुनावणी घेण्यात आली त्यावेळी निर्मात्यांच्या वतीने हायकोर्टात प्रतिज्ञापत्र सादर करण्यात आले. हायकोर्टाने प्रतिज्ञापत्र स्वीकारत सुनावणी बुधवार पर्यंत तहकूब केली.

आपली प्रतिक्रिया द्या