मुरुमांपासून सुटका हवीये? मग रिकाम्या पोटी हे पदार्थ खा…

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

अनेकांना त्वचेवर मुरुमांची समस्या असते. फोडासारख्या पुटकुळ्या, त्यातून वाहणारा पस आणि त्यानंतर राहणारा डाग आणि खड्डा… यांमुळे मुरुमांचा त्रास असलेली व्यक्ती हैराण झालेली असते. त्वचेवरील उपायांसोबत आहारातही काही बदल करून मुरुमांपासून सुटका मिळू शकते.

मुरुमं फक्त चुकीचे प्रॉडक्ट्स किंवा प्रदूषणामुळे येत नाहीत. त्यापाठी अन्यही अनेक कारणं असू शकतात. खाण्यापिण्याच्या सवयी, कमी पाणी पिणं, पोट खराब असणं यांमुळेही मुरुमांची समस्या उद्भवते. जर तुम्हाला मुरुमांची समस्या असेल तर काही पौष्टिक गोष्टींचं सेवन करून ती कमी करता येऊ शकते. त्यासाठी उपाशीपोटी हे पदार्थ खाऊन पाहू शकता.

सकाळी उठल्यावर उपाशी पोटी कच्च्या आवळ्याचं सेवन मुरुमांच्या समस्येसाठी लाभदायक ठरतं. त्वचेसोबत केसांसाठीही आवळा उत्तम पोषक आहे. आवळ्यातील अँटीऑक्सिडंट्समुळे त्वचेवरील मुरुमांना आराम पडतोच पण डागही गायब होतात. रोज सेवन करायला सुरुवात केल्यानंतर साधारण आठवड्याभरानेच तुम्हाला फरक दिसू लागतो.

उपाशीपोटी नारळ पाणी पिणंही लाभदायक असतं. नारळ पाणी हे नैसर्गिक डीटॉक्स वॉटर म्हणून ओळखलं जातं. शरीरातील विषारी द्रव्य ते बाहेर काढतं. त्यामुळे मुरुम कमी होतात. तसंच सुरकुत्या, एक्झिमा सारखे विकार यांच्यातही आराम पडतो.

पाण्यात भिजवलेले बदाम हे देखील मुरुमांना कमी करतता. चेहऱ्याच्या त्वचेचा पोत सुधारणं तसंच चेहऱ्याला नैसर्गिक उजाळा देणं यासाठी बदाम अवश्य खावेत. रोज रात्री पाण्यात भिजवून ठेवलेले बदाम सकाळी उपाशी पोटी सोलून खावेत. एका वेळी दोन ते चार बदाम खाल्ले तरीही फरक जाणवू लागतो. त्वचा कोरडी पडण्यासह त्वचेच्या अन्य समस्यांपासूनही आराम मिळतो.

अनेकांना सकाळी उठल्यानंतर लगेच चहा किंवा कॉफी घ्यायची सवय असते. पण, चहा किंवा कॉफीऐवजी दोन ग्लास कोमट पाणी प्यायल्याने फायदा होऊ शकतो. कोमट पाणी प्यायल्याने त्वचा उजळते तसंच रात्रीनंतर बराच काळ पाणी न मिळाल्याने आकसलेल्या पेशींना पाणी मिळतं. त्यामुळे त्वचेचं आरोग्य सुधारायला मदत मिळते.

सकाळी मिश्र भाज्यांचा रस प्यायल्यानेही मुरुमांपासून मुक्तता मिळू शकते. शक्यतो या ज्यूसमध्ये क जीवनसत्व असलेली फळं किंवा भाज्या यांचा समावेश करावा. विशेषतः बीट, गाजर यांचा अवश्य समावेश करावा, या दोन्ही भाज्यांमुळे चेहऱ्यावर मुरुमांची समस्या दूर होऊन चेहऱ्याचा रंग उजळतो.