Pimpri Chinchwad crime – चोरट्याचा लुटमारीचा डाव दोन भावांनी हाणून पाडला

पार्सल आल्याचा बहाणा करून घरात घुसलेल्या चोरट्याने दोघा भावांवर गन आणि कुकरीने हल्ला चढवत लूटमारीचा प्रयत्न केला. मात्र, प्रसंगावधान राखत एका भावाने चोरटयाला पाठीमागून पकडत त्याचा हल्ला परतावून लावला. दरम्यान, दोन्ही भावांनी आरडाओरडा केल्यानंतर आजूबाजूच्या नागरिकांनी धाव घेऊन चोरट्याला पकडून पोलिसांच्या हवाली केले. या हल्ल्यात एक भाऊ जखमी झाला आहे. ही घटना 31 जुलै रोजी सायंकाळी सातच्या सुमारास पिंपळे गुरव येथील कल्पतरू इस्टेट सोसायटीमध्ये घडली.

सांगबोई कोम सेरटो (वय – 40, रा. सर्वोदय सोसायटी, कोंढवा खुर्द, मूळ मणिपूर) असे चोरट्याचे नाव आहे. गगन सिताराम बडेजा (वय – 31) यांनी फिर्याद दिली आहे. पोलिस निरीक्षक अमोल नांदेकर यांनी याबाबत माहिती दिली. फिर्यादी गगन संगणक अभियंता आहेत. घरी पत्नी, वडील, आई आणि भाऊ यांच्या समवेत हे राहतात. सातव्या मजल्यावर बडेजा कुटुंब वास्तव्यास आहे. त्यांचे वडील सिताराम बँकेत व्यवस्थापक आहेत. कामानिमित्त ते दिल्लीला गेले आहेत.

कोम उच्चशिक्षित असून त्याला दरमहा 1 लाख 30 हजार पगाराची आयटी कंपनीत नोकरी होती. मात्र, नोकरी गेल्याने ऑगस्ट2024 पासून तो बेरोजगार होता. त्याने कोंढवा आणि उंड्री पिसोळी येथे फ्लॅट घेतला होता. फ्लॅटचे हप्ते सुरू आहेत. मात्र, वर्षभरापासून नोकरी नसल्याने तो कर्जबाजारी झाला. त्यामुळे त्याने पैसे मिळवण्याच्या उद्देशाने चोरीचा कट रचला.

पोलिसांनी कोम याच्याकडून बारा बोअरची गन, 19 काडतुसे आणि कुकरी जप्त केली. कोम याच्याकडे गनचा मणिपूर येथील परवाना असल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. त्याच्यावर याआधी कोणताही गुन्हा दाखल नाही. येरवडा कारागृहात त्याची रवानगी करण्यात आली आहे.

तीन महिने पाळत

कोम याने तीन महिन्यांपूर्वी सीताराम बडेजा यांचा पाठलाग करून ते कुठे राहतात याची पाहणी केली होती. त्यानंतर 31 जुलैला तो बसने नाशिक फाट्यापर्यंत आला. तेथून रिक्षाने थेट सोसायटीत गेला. सहाव्या मजल्यापर्यंत चालत गेला. घराच्या बाहेर दारू प्यायला. त्यानंतर त्याने बडेजा यांच्या घराची बेल वाजवली, असे पोलिसांनी सांगितले.