
पिंपरी- चिंचवड महापालिकेचे आकुर्डी येथील शाळेचे मैदान प्रशासनाने राष्ट्रवादीच्या माजी नगरसेवकाच्या मंडळाला गणेशोत्सव साजरा करण्यासाठी दिले होते. मात्र, महापालिका प्रशासनाला आता उपरती झाली आहे. आयुक्तांचे आदेश असल्याचे सांगत युवासेनेच्या पदाधिकाऱ्याला नवरात्रोत्सव कार्यक्रमासाठी परवानगी नाकारली. या तुघलकी निर्णयामुळे संताप व्यक्त केला जात आहे.
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) युवासेनेचे शहर उपप्रमुख निखिल दळवी यांनी याबाबत क्षेत्रीय अधिकारी निवेदिता घार्गे यांना निवेदन दिले आहे. तसेच, माजी आमदार, जिल्हाप्रमुख अॅड. गौतम चाबुकस्वार यांनीही आयुक्त शेखर सिंह यांचे निवेदनाद्वारे लक्ष वेधले आहे. विठ्ठल प्रतिष्ठानतर्फे प्रभाग क्रमांक १४ मधील शितळादेवी मंदिरामागील वसंतदादा पाटील मराठी व फकीर भाई पानसरे उर्दू महापालिका शाळा मैदानावर दरवर्षी नवरात्र उत्सव कार्यक्रम साजरा केला जातो. कार्यक्रमाची वेळ सायंकाळी सातपासून रात्री दहापर्यंत असते. कोणताही त्रास होत नाही.
प्रतिष्ठानमार्फत ऑनलाइनव ऑफलाइन पद्धतीने करण्यात आला. मात्र, परवानगी नाकारली. राष्ट्रवादीच्या माजी नगरसेवकाच्या मंडळाला शाळेचे मैदान देण्यात आले होते. एकच महिना उलटत नाही तोच दुसऱ्या धार्मिक कार्यक्रमासाठी परवानगी नाकारण्यात कशी येते, असा सवाल दळवी यांनी केला. या मैदानावर दरवर्षी आम्ही नवरात्रोत्सव कार्यक्रम करतो. कार्यक्रमाची सर्व तयारी झाली असल्याने कार्यक्रम रद्दही करू शकत नसल्याने कार्यक्रमास परवानगी मिळावी, अशी मागणी दळवी यांनी केली आहे.
गणेशोत्सवात शाळेच्या मैदानात मंडप टाकण्यासाठी परवानगी देण्यात आली होती. मात्र, महापालिका आयुक्तांनी शाळेचे मैदान कोणत्याही कार्यक्रमासाठी द्यायचे नाही, असे आदेश जारी केले आहेत. त्यामुळे नवरात्रोत्सवासाठी शाळेचे मैदान कोणत्याही संस्था किंवा राजकीय पक्षाला देता येणार नाही.
– निवेदिता घार्गे, अ क्षेत्रीय अधिकारी, महापालिका