
सहा फूट अरूंद खोल खड्ड्यात पडलेल्या कुत्र्याच्या तीन पिल्लांना स्वत:चा जीव धोक्यात घालून अग्निशामक दलाच्या जवानांनी वाचविले. ही घटना वाल्हेकरवाडी, चिंचवड येथील मौनीबाबा आश्रमाजवळ गुरूवारी सायंकाळी घडली.
वाल्हेकरवाडी येथील मौनीबाबा आश्रमाजवळ रस्त्यालगत असलेल्या सहा फूट खोल अरुंद खड्ड्यात तीन कुत्र्याची पिल्ले पडली असल्याची माहिती अग्निशामक दलास गुरुवारी मिळाली. त्यानुसार, प्राधिकरण अग्निशामक उपकेंद्राचे प्रदिप काबंळे, परशुराम इसवे, सारगं मगंळरुकर, विकास बोंगाळे, अकुंश बडे, विजय इंगळे हे जवान घटनास्थळी दाखल झाले. त्या अरूंद खड्ड्या मध्ये जाण्यास जागा नसल्याने खड्ड्याभोवतीची थोडी माती उकरली. त्यानंतर अग्निशामक दलाचे जवान अंकुश बडे हे त्या अरुंद खड्ड्यामध्ये उतरले. बॅटरीच्या प्रकाश झोतात कुत्र्याच्या पिल्लांचा शोध घेऊन तीन पिल्लांंना सुखरूपरित्या बाहेर काढले. एकीकडे कासारवाडीत दोन दिवसांपूर्वी दुचाकीला बांधून फरफटत नेत कुत्र्याला ठार मारल्याची घटन ताजी असतानाच अग्निशामक दलाच्या जवानांनी स्वत:चा जीव धोक्यात घालून कुत्र्याच्या तीन पिल्लांना वाचविलेल्या कामाचे कौतुक होत आहे.

































































