
बाळ तोरसकर,[email protected]
टेबल टेनिस… अनेक नावे असलेला हा खेळ छोटासा चेंडू आणि छोटय़ाशा रॅकेट्स अशा वेगळ्या वैशिष्टय़ांमुळे स्वतःचे वेगळेपण टिकवून आहे.
टेबल टेनिस हा खेळ अतिशय वेगवान व खेळाडूंना शारीरिकदृष्टय़ा योग्य असा व्यायाम देणारा खेळ आहे. या खेळाची सुरुवात साधारण 1890 च्या सुमारास झाल्याचे दाखले इतिहासात मिळतात.
सुरुवातीला हा खेळ ‘पिंग-पाँग’ या नावाने खेळला जात असे. खरंतर ‘पिंग-पाँग’ याचा लॅटिन भाषेत टेबल असा अर्थ होतो म्हणूनच कदाचित हेच नाव पुढे दृढ झाले असावे. पुढे साधारण 1900 मध्ये ‘पिंग-पाँग’ असोसिएशनची स्थापना झाली. या खेळाची गंमत म्हणजे सुरुवातीला टेबलावर मधे पुस्तके उभी करून व एक-एक पुस्तक दोन खेळाडू चेंडू इकडून तिकडे टोलावण्यासाठी उपयोग करत असत. पूर्वी या खेळाला ‘गॉसीमा’ असेही एक नाव होते. अमेरिकेत या खेळास ‘दिवाणी टेनिस’ असेही नाव दिलं होते. काही जण या खेळास ‘व्हीपव्हॅप’ असेही म्हणत असत. 1902 मध्ये इंग्लंडमध्ये ‘पिंग-पाँग’ असोसिएशनची स्थापना झाली व त्याची स्पर्धासुद्धा भरवण्यात आली. पुढे त्यात सुधारणा होत हा खेळ व त्याचे नियम 1901 ते 1922 या कालावधीत सातत्याने बदलत गेले व या खेळात सुधारणा आणण्यासाठी वेगवेगळे प्रयोगसुद्धा केले गेले.
इंग्लंडमधील खुल्या स्पर्धांची सुरुवात 1921 पासून झाली. 1921 मध्ये ब्रिटनमध्ये टेबल टेनिस महासंघाची स्थापना झाली. 1922 मध्ये पुन्हा या खेळामध्ये नवनवे बदल होत गेले व ‘टेबलटेनिस’ हे नाव दृढ झाले. त्यानंतर मात्र हा खेळ बहरला. ब्रिटनच्या पुढाकाराने व जर्मनी, हंगेरी यांच्या साथीने 1926 साली ‘इंटर-नॅशनल फेडरेशन’ ची स्थापना झाली. ब्रिटन, स्वीडन, हंगेरी, भारत, डेन्मार्क, जर्मनी, चेकोस्लोव्हाकिया, ऑस्ट्रिया आणि वेल्स हे त्या फेडरेशनचे संस्थापक सदस्य आहेत. त्यानंतर अनेक देश या संघटनेला संलग्न झाले व हा खेळ सुध्दा बहरला. आशिया, आफ्रिका, उ. अमेरिका, द.अमेरिका इ. मोठया संघटना सुध्दा स्थापन झाल्या. 1950च्या दशकात टेबल टेनिस रॅकेट मध्ये रबराबरोबर स्पंजचा उपयोग करण्यात आला आणि या खेळाचा वेग व फिरक यामध्ये नाटयमय बदल झाला. त्यामुळे खेळाला एक वेगळी उंची प्राप्त झाली व त्याची लोकप्रियताही वाढली. या खेळातील एक महत्वाचा नियम म्हणजे आरंभी खेळी करताना चेंडू तळहातावर ठेवावा लागतो. तो उडवून सुरुवातीची खेळी करायची असते. ज्या हातावर चेंडू आहे तो टेबलावरच हवा, प्रतिपक्षाला तो दिसावा असा त्यामागे हेतू असतो. याला ओपन सर्विस असेही म्हणतात. गणवेश कोणत्या रंगाचा घालावा असा नियम नसला, तरी खेळाडूच्या शर्टचा रंग गडद असावा व तो पांढरा किंवा पिवळा नसावा असेही या खेळात ठरलेले आहे व शक्यतो पांढरे बूट वापरावेत असा नियम आहे. भारतात पुरुष, स्त्रिया, मुले व मुली यांच्यामधील एकेरी, दुहेरी व मिश्र स्वरूपाचे सामने प्रतिवर्षी राज्य व राष्ट्रीय पातळीवर होतात राष्ट्रीय स्पर्धेत दिल्ली व महाराष्ट्र येथील संघ बलवान आहेत. पुरुष गटात विजयी होणाऱया संघाला ‘बर्ना बेलक कप’ देतात व महिलांच्या विजयी संघाला ‘जयलक्ष्मी कप’ देतात, पुरुषांच्या गटाला ‘रंगारामानुजम कप’ देण्यात येतो तर मुलींच्या गटाला ‘पद्मावती कप’ दिला जातो.
एका खेळाडूने दुसऱया खेळाडूकडे जाळीवरून चेंडू मारायचे व त्याने तो परत पहिल्या खेळाडूकडे टोलवावा लागतो. या खेळात सुरुवातीला टेबलाच्या कोणत्याही कोपर्यातून आपल्या भागात एक टप घेऊन चेंडू दुसऱया म्हणजेच प्रतिपक्षाच्या टेबलाच्या भागात पडला पाहिजे असा खेळावा लागतो. त्यानंतर मात्र तो प्रतिस्पर्धी खेळाडूच्या भागातील टेबलावरच पाडवा असा खेळला जातो. यात चूक झाली तर विरुद्ध खेळाडूस एक गुण मिळतो. एका डावात अकरा गुण मिळवणारा खेळाडू तो डाव जिंकतो व तीन पैकी दोन डाव जिंकणारा खेळाडू हा सामन्यातील विजय खेळाडू म्हणून घोषित केले जाते. या खेळात एक टप्पा पडल्यावर चेंडू परत टोलवायचा असल्याने दोन्ही खेळाडूंना सतत हालचाली कराव्या त्यामुळेच खेळाडूंच्या हालचाली व निर्दोष दृष्टी यांची कसोटी लागते.

























































