मेट्रोचे काम सुरू असताना जलवाहिनी फुटली, जोगेश्वरी, वांद्रे, घाटकोपर,अंधेरीत पाणीपुरवठा विस्कळीत

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

जोगेश्वरी-विक्रोळी लिंक रोडजवळ मेट्रोचे काम सुरू असताना पालिकेची मोठी जलवाहिनी फुटल्यामुळे अंधेरी, वांद्रे, जोगेश्वरी आणि घाटकोपर पश्चिम भागात पाणीपुरवठा विस्कळीत झाला आहे. परिणामी पाणी नसल्यामुळे रहिवाशांची प्रचंड गैरसोय होत आहे.

बुधवारी सकाळच्या सुमारास ही जलवाहिनी फुटल्याने मोठय़ा प्रमाणात पाणी वाया गेले. यामुळे अनेक भागांत पाणीपुरवठय़ावर परिणाम झाला आहे. मेट्रो-6च्या पायलिंगचे काम सुरू असताना 1800 मिलीमीटर व्यासाची ही जलवाहिनी फुटली. जलवाहिनी फुटल्याची माहिती मिळताच पालिकेच्या जल अभियंता विभागाकडून जलवाहिनीच्या दुरुस्तीचे काम सुरू करण्यात आले. पालिकेच्या माध्यमातून वांद्रे पश्चिम, सांताक्रुझ पूर्व, मालाड, विलेपार्ले, अंधेरी या भागांत पालिकेतर्फे पाण्याचे टँकर पुरविण्यात आले. शिवसेना उपविभागप्रमुख जितेंद्र जानावळे यांच्यासह अनेक शिवसैनिकांनी खासगी विहिरीतून पाणीपुरवठा करण्यास रहिवाशांना मदत केली. महापौर किशोरी पेडणेकर, पालिका आयुक्त प्रवीण परदेशी यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी करून लवकरात लवकर पाणीपुरवठा सुरळीत करावा असे निर्देशही त्यांनी प्रशासनाला दिले.

दुरुस्ती पूर्ण; रविवारपासून पाणीपुरवठा
वेरावली जलवाहिनी दुरुस्तीचे काम शनिवारी रात्री पूर्ण झाले. जलाशय भरण्याची प्रक्रिया सुरू झाली असून ते भरल्यावर वांद्रे, अंधेरी, जोगेश्वरी, घाटकोपर, कुर्ला या भागांत रविवारपासून पाणीपुरवठा पूर्ववत करण्यात येणार आहे.