आईन्स्टाईनने गुरुत्वाकर्षणाच्या शोधावेळीही आकडेमोड केली नव्हती! पीयूष गोयल अजब वक्तव्य

463

केंद्रीय रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांच्या एका अजब वक्तव्यामुळे सध्या चांगलाच गदारोळ माजला आहे. देशातल्या आर्थिक मंदीवर भाष्य करताना गोयल यांनी आईन्स्टाईननेही गुरुत्वाकर्षणाच्या शोधावेळी गणिताचं साहाय्य घेतलं नव्हतं, असं अजब विधान केलं आहे. त्यांच्या या विधानामुळे नेटकऱ्यांनी त्यांना ट्रोल केलं आहे.

व्यावसायिकांसाठीच्या एका कार्यक्रमात गोयल सहभागी झाले होते. त्यावेळी त्यांना अर्थव्यवस्थेतील सद्यस्थितीविषयी तसेच मंदीविषयी प्रश्न विचारण्यात आले. त्यावर उत्तर देताना गोयल म्हणाले की, टीव्हीवर दाखवण्यात येणाऱ्या आकड्यांवर अवलंबून राहू नका. आईन्स्टाईननेही गुरुत्वाकर्षणाचा शोध घेताना गणिताची आकडेमोड केली नव्हती. जर ते जुन्याच समीकरणावर काम करत राहिले असते तर मला नाही वाटत की या जगात काही महत्त्वाचा शोध लागू शकला असता, असं विचित्र विधान गोयल यांनी केलं आहे.

नेटकऱ्यांनी या विधानावर गोयल यांना ट्रोल करायला सुरुवात केली आहे. कारण, गुरुत्वाकर्षणाचा शोध हा आईन्स्टाईनने नव्हे तर सर आयझॅक न्यूटन यांनी लावला आहे. अल्बर्ट आईन्स्टाईन यांनी e=mc2 हा सापेक्षतावादाचा सिद्धांताचा शोध लावला आहे. त्यामुळे जर गुरुत्वाकर्षणाचा शोध आईन्स्टाईनने लावला असेल तर न्यूटनने काय केलं असा प्रश्न विचारत नेटकरी गोयल यांना ट्रोल करत आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या