पीयूष गोयल यांच्या बैठकीवर बहिष्कार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । मुंबई

मुंबईच्या रेल्वे प्रश्नावर चर्चा करण्यासाठी रेल्वेमंत्री पीषूय गोयल यांनी आज सह्याद्री अतिथीगृहावर आयोजित केलेल्या रेल्वेच्या बैठकीला भाजपच्या मेळाव्याचे स्वरूप आले होते. भाजप कार्यकर्त्यांच्या गराडय़ात अडकलेल्या गोयल यांना मुंबईतील खासदार-आमदारांशी रेल्वे प्रश्नावर चर्चा करण्यासाठी वेळ मिळाला नाही. या प्रकारामुळे संतप्त झालेल्या शिवसेनेच्या आमदार-खासदारांनी या बैठकीवर बहिष्कार टाकला. शिवसेनेच्या लोकप्रतिनिधींसोबत इतर पक्षांच्या लोकप्रतिनिधींनीही काढता पाय घेतला.

मुंबईतील रेल्वेच्या प्रश्नांवर चर्चा करण्यासाठी केंद्रीय रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांच्या रेल्वे मंत्रालयातून मुंबईतील सर्व पक्षांचे खासदार व आमदारांना रीतसर पत्र पाठवून 31 ऑगस्ट रोजी दुपारी दोन ते चार वेळेत बैठकीचे आमंत्रण देण्यात आले होते. मुंबईकरांच्या जिव्हाळ्याच्या विषयावर बैठक असल्याने शिवसेनेसह सर्व पक्षांचे लोकप्रतिनिधी समस्या मांडण्यासाठी पत्र व मुंबईतील रेल्वे प्रवाशांच्या समस्या घेऊन आले होते. बैठकीच्या वेळेस लोकप्रतिनिधी सह्याद्री अतिथीगृहावर पोहचले तेव्हा अतिथीगृहावर भाजप कार्यकर्त्यांची प्रचंड गर्दी उसळली होती. बैठकीची वेळ झाली तरी लोकप्रतिनिधींना तसेच रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना ताटकळत ठेवत पीयूष गोयल हे भाजप कार्यकर्त्यांसोबत गप्पांमध्ये मशगूल झाले होते. भाजपचे मुंबई अध्यक्ष आशीष शेलार व त्यांच्या सोबत आलेल्या भाजप कार्यकर्त्यांचा खास पाहुणचार सुरू होता.

काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस व भाजपसह सर्वच पक्षांचे लोकप्रतिनिधी व रेल्वेचे अधिकारी एक तास ताटकळत होते, पण तरीही गोयल कार्यकर्त्यांच्या गराडय़ातून बाहेर पडले नाहीत. अखेर शिवसेना खासदार राहुल शेवाळे, खासदार अरविंद सावंत, खासदार श्रीकांत शिंदे, आमदार मंगेश कुडाळकर संतप्त झाले. हे सर्वजण सह्याद्री अतिथीगृहावरून सरळ बाहेर पडले. गोयल भेटत नसल्याने भाजपचे लोकप्रतिनिधी अस्वस्थ झाले होते पण पक्षकारवाईच्या भीतीने भाजपचे लोकप्रतिनिधी असहायपणे तिष्ठत बसले होते. खुद्द रेल्वेमंत्री असल्याने रेल्वेच्या अधिकाऱ्यांनाही बाहेर पडता आले नाही. या प्रकाराबाबत शिवसेना खासदार राहुल शेवाळे यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. सामान्य माणसांना भेडसावणाऱया रेल्वेच्या समस्यांवर चर्चा करण्यासाठी आम्ही या बैठकीला आलो होतो. रेल्वेमंत्र्यांनीच या बैठकीचे आमंत्रण दिले होते, मात्र या बैठकीचे नियोजन व्यवस्थित नसल्याने आम्ही गोयल यांना न भेटताच बाहेर पडलो असे शेवाळे म्हणाले.