
सरकारने दोन डोसच्या केलेल्या सक्तीमुळे लसीकरणाचे महत्त्व वाढले असून, केंद्रांवर पुन्हा रांगा लागल्या आहेत. एकीकडे लसीकरणाची सक्ती केली असताना, दुसरीकडे लसीकरणाचे नियोजन मात्र काटेकोर होताना दिसत नाही. त्यामुळे बऱ्याच केंद्रांवर हमरीतुमरीचे प्रकार घडू लागले आहेत. त्यामुळे लसीकरण केंद्रांनाच प्रथम नियोजनाचा डोस द्यावा, अशी मागणी नागरिकांतून होत आहे.
सोलापूर महापालिकेच्या 35 मुख्य आणि छोटय़ा 60 ते 70 कॅम्पच्या माध्यमातून दिवसाकाठी अडीच-तीन हजार लसीकरण होत आहे. मागील दोन दिवसांत लसीकरण करून घेणाऱ्यांची संख्या प्रतिदिवस 10 हजारांवर पोहोचली आहे. चार महिन्यांनंतर सोलापूर महापालिकेची आरोग्य केंद्रे पुन्हा भरलेली दिसत आहेत.
सोलापूर महापालिका आरोग्य विभाग लसीकरण मोहीम वाढविण्यासाठी गेल्या चार महिन्यांपासून मोबाईल क्लिनिक, युवा स्वास्थ्य अभियान आणि आता ‘हर घर दस्तक’ असे विविध उपक्रम राबवीत आहे. मात्र, त्याला म्हणावा तसा प्रतिसाद मिळत नव्हता. देशात ‘ओमायक्रॉन’च्या रुग्णांची भीती आणि सरकारने केलेल्या दोन डोसच्या सक्तीचा परिणाम होऊन दुर्लक्ष केलेली मंडळीदेखील लसीकरणाकडे वळली आहेत. बँक, शासकीय कार्यालये, मोठमोठी आस्थापने या ठिकाणी दोन डोसच्या प्रमाणपत्राची केलेली सक्ती पाहून अचानकच गर्दी वाढली आहे. याची शक्यता लक्षात घेऊन केंद्रांवर नियोजन करणे अपेक्षित असताना, तसे होताना दिसत नाही. परिणामी, लसीकरणासाठी निघालेल्या नागरिकांना नाहक त्रासाला सामोरे जावे लागत आहे. सरकारच्या निर्देशानुसार जिल्हा आणि शहर प्रशासनाने नियम काटेकोरे केले आहेत. मात्र, काही लसीकरण केंद्रांवर नियोजनाकडे दुर्लक्ष होत असल्याने नागरिकांना हेलपाटे मारावे लागत आहेत. स्लॉट बुक असतानाही वेळेपूर्वीच लस संपल्याचे कारण सांगून नागरिकांना परत किंवा दुसऱया केंद्राकडे पाठविले जात आहे. नियोजनात सुसूत्रता आणल्यास आणि नियमांचे पालन झाल्यास लसीकरणाचा वेग आणखी वाढू शकेल, अशी चर्चा लसीकरण केंद्रांवर रंगत आहे.

























































