
जून 2018 पासून राज्यात प्लॅस्टिकबंदी असतानाही बिनदिक्कतपणे प्लॅस्टिकचा वापर करणाऱयांना 1 मार्चपासून चांगलाच दणका बसणार आहे. यामध्ये प्रतिबंधित प्लॅस्टिक आढळल्यास थेट पाच हजारांचा दंड वसूल केला जाणार आहे. शिवाय दुसऱया गुन्ह्यासाठी दहा हजार तर तिसऱ्या गुन्ह्यासाठी 25 हजारांचा दंड आणि तीन महिन्यांच्या तुरुंगवासाची शिक्षा होणार आहे. त्यामुळे मुंबईकरांना उद्या 1 मार्चपासून कापडी पिशवीच वापरावी लागणार आहे. पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी कालच 1 मेपर्यंत महाराष्ट्र ‘प्रतिबंधित’ प्लॅस्टिकमुक्त करण्यासाठी कार्यवाही करण्याचे निर्देश दिल्यानंतर पालिकेने ही धडक कार्यवाही सुरू केली आहे.
पर्यावरणरक्षण आणि संवर्धनासाठी मुंबईसह राज्यभरात 23 जून 2018 पासून प्लॅस्टिकबंदी लागू करण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर पालिकेकडून बाजार, दुकाने-आस्थापना आणि अनुज्ञापन विभागातील 310 निरीक्षकांच्या ‘ब्ल्यू स्कॉड’च्या माध्यमातून कारवाई सुरू आहे. निळा कोट आणि काळी टोपी घातलेल्या निरीक्षकांकडून विविध ठिकाणी तपासणी सुरू आहे. असे असले तरी मुंबईत सध्या अनेक ठिकाणी सर्रासपणे प्लॅस्टिक पिशव्यांसह बंदी घातलेले प्लॅस्टिक वापरले जात आहे. त्यामुळे पालिकेने आता प्लॅस्टिकबंदीची कारवाई तीव्र करण्याचा निर्णय घेतला असून मे 2020 पर्यंत मुंबई ‘सिंगल युज डिस्पोजेबल प्लॅस्टिकमुक्त’ करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.
या प्लॅस्टिकवर आहे बंदी
महाराष्ट्र शासनाच्या अधिसूचनेनुसार संपूर्ण राज्यात ‘प्रतिबंधित’ प्लॅस्टिकचे उत्पादन, वापर, विक्री, वाहतूक, हाताळणी, साठवणूक यावर बंदी घालण्यात आली आहे. यामध्ये हँडल असलेल्या व नसलेल्या प्लॅस्टिकच्या पिशव्या, प्लॅस्टिकपासून बनवण्यात आलेल्या आणि एकदाच वापरल्या जाणाऱया ताट, कप, प्लेटस्, ग्लास, चमचे, हॉटेलमध्ये अन्न पॅकिंग करण्यासाठी वापरल्या जाणाऱया प्लॅस्टिकच्या वापरावर बंदी घालण्यात आली आहे. याशिवाय द्रवपदार्थ साठविण्यासाठी कापरात येणारे कप, पाऊच व सर्व प्रकारचे अन्नपदार्थ, धान्य साठकिण्यासाठी आणि पॅकेजिंगसाठी वापरल्या जाणाऱया प्लॅस्टिकवर बंदी घालण्यात आली आहे.
आतापर्यंत 4 कोटी 65 लाखांचा दंड वसूल
जून 2018 पासून प्लॅस्टिकविरोधी कारवाईत 16 लाख आस्थापनांची तपासणी करण्यात आली आहे. या कारवाईत 85 हजार किलो प्लॅस्टिक जप्त करण्यात आले असून सुमारे 4 कोटी 64 लाख 30 हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे.
विद्यार्थी देणार शपथपत्र
शिक्षण विभागाकडून विद्यार्थ्यांना प्लॅस्टिक न वापरण्याची शपथ देणे, विद्यार्थ्यांच्या घरातील प्लॅस्टिक आणून शाळेत जमा करणे, प्लॅस्टिकबंदीसाठी स्पर्धा आयोजित करणे आणि सर्व शाळांमधून प्रतिबंधित प्लॅस्टिक वापरत नसल्याबाबत हमीपत्र करून घेण्यात येईल.
अशी होणार कार्यवाही
– 1 मार्चपासून पालिकेच्या सर्व 24 वॉर्डांमध्ये सुरू होणाऱया कारवाईत अनुज्ञापन (परवाना), आरोग्य, बाजार, दुकाने व आस्थापना, शिक्षण विभागाच्या अधिकाऱयांचे पथक तयार करण्यात आले आहे.
– हे पथक विविध आस्थापनांची कार्यालये, मंगल कार्यालये, हॉटेल, मॉल, दुकाने, मार्केट यामध्ये धाड टाकून प्रतिबंधित प्लॅस्टिक आढळल्यास कारवाई करेल.
– पालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाकडून विविध ठिकाणी डबे पुरवणे, जमा झालेल्या प्लॅस्टिकची विल्हेवाट लावणे, जनजागृती करणे, सेवाभावी संस्थांची मदत घेणे, प्रतिबंधित प्लॅस्टिकला पर्याय उपलब्ध करून देणे, असे उपक्रम राबवण्यात येतील.
– व्यापारी संघटनांसोबत समन्वय, नाटय़गृहांशी समन्वय, ज्येष्ठ नागरिक, सेवानिवृत्त नागरिकांचा मोहिमेत सहभाग, ‘बेस्ट’मध्ये जनजागृती, समन्वयासाठी विभागवार नोडल अधिकारी नेमणे, प्रतिबंधित प्लॅस्टिकबाबत तक्रारीसाठी टोल-फ्री क्रमांकही उपलब्ध करून देण्यात येणार आहे.




























































