मराठमोळ्या खेळांचा पाठीराखा गेला, प्रशिक्षक शिवराम सोनवडेकर यांचे निधन

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी, मुंबई

लाल मातीत खेळाडू म्हणून दम घुमवल्यानंतर नंतर कबड्डी, खो-खो आणि कुस्तीसारख्या मराठमोळय़ा खेळांना वर्तमानपत्रात मानाचे स्थान मिळवून देणारे हाडाचे क्रीडा पत्रकार, ऍथलीट, क्रीडा संघटक, खो-खो, कबड्डी प्रशिक्षक शिवराम सोनवडेकर यांचे आज सकाळी वृद्धापकाळाने निधन झाले. ते 70 वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात पत्नी व दोन मुली असा परिवार आहे.

सोनवडेकर यांनी आपल्या चार दशकांच्या कारकीर्दीत खेळाडू, संघटक, प्रशिक्षक आणि पत्रकार असा देशी खेळांना वाहिलेला संस्मरणीय प्रवास केला. क्रीडा पत्रकारितेत देशी खेळांना मानाचे स्थान मिळवून देण्यापूर्वी ते एक चांगले ऍथलीट म्हणून सर्वांच्या परिचयाचे होते. त्यांची धावण्याची आवड आणि लालबाग-परळमध्ये बालपण गेल्यामुळे कबड्डी, खो-खो त्यांच्या रक्तातच होते. एक धावपटू म्हणून त्यांनी रुपारेल महाविद्यालयातली आपली कारकीर्द चांगलीच गाजवली.