‘सावित्री’चा प्रवास

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । मुंबई

उमलत्या वयापासून परिपक्वतेपर्यंत प्रवास करणाऱया एका तरल मनाच्या स्त्रीची 49 पत्रं ‘सावित्री’ या लेखक पु. शि. रेगे यांच्या पत्रात्मक कादंबरीत वाचायला मिळतात. या कादंबरीचा एकपात्री नाटय़ाविष्कार मिती चार कल्याण, अस्तित्व मुंबई निर्मित आणि डॉ. संतोष पोटे प्रस्तुत प्रायोगिक रंगमंचावर सादर होत आहे.

‘सावित्री’ ही पु. शि. रेगे यांची पत्र रुपातली कादंबरी..तिचा एकपात्री नाटय़ाविष्कार रसिकांसमोर सादर करण्याविषयी कवयित्री आणि अभिनेत्री डॉ, प्रिया जामकर सांगतात, कादंबरीचा रंगमंचीय आविष्कार सादर करण्याची संकल्पना दिग्दर्शक रविंद्र लाखे यांची आहे. ‘सावित्री’ त्यांना रंगमंचावर सादर करायची होती. यापूर्वी मला नाटकाचा काहीच अनुभव नव्हता. त्यामुळे या एकपात्री प्रयोगाची तयारी त्यांनी माझ्याकडून करवून घेतली. आवाजातील चढ-उतार, रंगमंचावर वावरणं, हावभाव करणं या गोष्टी मी त्यांच्याकडून शिकले. याशिवाय कादंबरीचं सूक्ष्म वाचन, त्यातील संवाद दीड तास एकटी रंगममंचावर साकार करतेय त्यामुळे काहीही न विसरता संवाद म्हणणं हे सगळं कसं निभवायचं याच्यासाठी करायच्या शारिरीक आणि मानसिक तयारीचं शिक्षण दिग्दर्शकांकडूनच मिळालं. यातील स्त्र्ााrसुलभ हालचाली हळूहळू सरावाने जमू लागल्या. त्यामुळे हे नाटक मला खूप आव्हानात्मक वाटलं. यामुळे स्वतःतील चिकाटी, सहनशीलता वाढते हे शिकायला मिळालं.

सर्वांनाच ‘सावित्री’ भावतेय
‘सावित्री’ ही अभिजात कादंबरी आहे. तिचा चाहता वर्ग आणि रेगे यांचा वाचक वर्ग या सर्वांना ती रंगमंचावरही भावतेय. पण त्याही पेक्षा ज्यांनी कादंबरी वाचली नाही यांनाही हे नाटक आवडतं.

कलाकृतीचा समृद्ध अनुभव
या नाटकात मानवी कल्याणाची शाश्वतता अनुभवायला मिळते. त्यामुळे एक ताजेपणा अनुभवण्यासाठी हे नाटक पाहावं. तरुण प्रेक्षकही या नाटकाला लाभत आहेत. विषय कळो किंवा न कळो साहित्याने समृद्ध जीवन म्हणजे सावित्रीची समृद्धता रसिकांसमोर यातून पोहोचते. तिच्या प्रेमाच्या, विचारांच्या, जगण्याच्या कल्पना प्रेक्षकांना भावतात. त्यामुळे या कलाकृतीतून मिळणारा आनंद अनुभवण्यासाठी हे नाटक पाहायला हवं, असं त्यांचं म्हणणं आहे.