कोरोनाच्या रुग्णावर प्लाझमा थेरपी, उपचाराला प्रतिसाद मिळत असल्याचा दिल्लीच्या डॉक्टरचा दावा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कोरोना व्हायरसने जगभरात धुमाकूळ घातला आहे. यावर अद्याप कोणतेही औषध उपलब्ध नाही. सोशल डिस्टन्स आणि क्वारंटाईन राहणे हाच या विषाणूला रोखण्याचा सर्वोत्तम उपाय असल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र दिल्लीतील एका खासगी रुग्णालयात कोरोनाच्या रुग्णावर प्लाझमा थेरपीचा प्रयोग करण्यात आला असून त्याला चांगला प्रतिसाद मिळत असल्याचा दावा उपचार करणाऱया डॉक्टरने केला आहे.

दिल्लीतील एक पन्नास वर्षीय व्यक्तीला कोरोनाचा संसर्ग झाल्यामुळे मॅक्स हेल्थकेअर हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. या व्यक्तीला अगोदरपासून काही व्याधी होत्या. रुग्णालयातील डॉ. संदीप बुद्धीराजा यांनी त्याच्यावर उपचार सुरू केले. रुग्ण कोणत्याही उपचारांना प्रतिसाद देत नव्हता. त्यानंतर आम्ही प्लाझमा थेरपीचा वापर करण्याचे ठरवले. आश्चर्य म्हणजे रुग्णाने त्याला प्रतिसाद दिला असे डॉ. बुद्धीराजा म्हणाले.

रमजानची नमाज घरातच, अजान देण्यावरही बंदी!
महिनाअखेर सुरू होणाऱया रमजानच्या पार्श्वभूमीवर आज कर्नाटक सरकारने लॉकडाऊन अधिक कडक केले. रमजानमध्ये एकत्र नमाज अदा करण्यास बंदी घालण्यात आली असून अजान देण्यासही सक्त मनाई केली आहे. सहरी तसेच इफ्तारचे आयोजनही करता येणार नाही. कर्नाटक सरकारच्या अल्पसंख्यांक विभागाने महिनाअखेर सुरू होणाऱया रमजानच्या पार्श्वभूमीवर आज काही निर्णय घेतले. घरीही नमाज अदा करताना एकत्र नमाज अदा करू नये, अशी सूचना देण्यात आली आहे. मशिदीवरील भोंगे बंद करून अजान बारीक आवाजात देण्यात यावी, असे सरकारने स्पष्ट केले आहे.

– आज देशभरात कोरोना बाधित रुग्णांची संख्या 12968 झाली. यात नव्याने 447 रुग्णांची भर पडली आहे. यात महाराष्ट्रातील 165, गुजरातेतील 105, मध्यप्रदेशातील 42 तसेच कर्नाटकातील 34, राजस्थानातील 28 तर उत्तरप्रदेशातील 19, पश्चिम बंगालमधील 18, हरियाणातील 9 रुग्णांचा समावेश आहे. तर कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची संख्या आज 438 झाली असून महाराष्ट्रातील मृतांचा आकडा 190 वर गेला आहे. 10824 रुग्णांवर उपचार सुरू असून जवळपास दीड हजार रुग्ण बरे झाले तर मृतांचा आकडा 438 वर गेला असल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या वतीने पत्रकार परिषदेत देण्यात आली.