
सामना ऑनलाईन । नवी दिल्ली
पुलवामा हल्ल्यानंतर हिंदुस्थान आणि पाकिस्तानमध्ये सध्या तणावाची परिस्थिती आहे. पाकिस्तान सीमारेषेवरही अकारण गोळीबार करत आहे. याच परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी नवी दिल्लीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या अध्यक्षतेखाली त्यांच्या निवासस्थानी राष्ट्रीय सुरक्षा परिषदेची बैठक बोलावण्यात आली. बैठकीमध्ये गृहमंत्री राजनाथ सिंह, अर्थमंत्री अरुण जेटली, संरक्षणमंत्री निर्मला सितारामन, परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल आणि परराष्ट्र सचिव विजय केशव गोखले सहभागी झाले. या बैठकीमध्ये देशातील सद्य परिस्थितीवर चर्चा झाली.
PM Modi chairs National Security Council meet, minister of CCS present in addition to NSA Ajit Doval and Foreign Secretary Gokhale. pic.twitter.com/jeEkEhAU79
— ANI (@ANI) March 3, 2019
जम्मू-कश्मीरमध्ये पुलवामा येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात हिंदुस्थानचे 40 पेक्षा जास्त जवान शहीद झाले. यानंतर चवताळलेल्या हिंदुस्थानने पाकिस्तानमध्ये घुसून दहशतवाद्यांचे तळ उद्धस्त केले. पाकिस्तानने हिंदुस्थानमध्ये एफ-16 या लढाऊ विमानांद्वारे घुसखोरीचा प्रयत्न केला, परंतु दक्ष वायुसेनेने तो हाणून पाडला. या दरम्यान पाकिस्तानला प्रत्युत्तर देताना मिग-21 या लढाऊ विमानाचे विंग कमांडर अभिनंदन पाकिस्तानच्या तावडीत सापडले, अखेर हिंदुस्थानच्या दबावानंतर त्यांची सुटका करण्यात आली. यानंतर दोन्ही देशांमधील संबंध कमालीचे ताणले गेले. सीमारेषेवर पाकिस्तानी सैन्याकडून सातत्याने हिंदुस्थानातील गावं आणि लष्करी चौक्यांना लक्ष्य केले जात आहे. याच परिस्थितीचा आढवा घेण्यासाठी पंतप्रधानांनी राष्ट्रीय सुरक्षा परिषदेची बैठक बोलावली.
























































