तरुणांना अराजकता आवडत नाही!‘सीएए’ आंदोलनावर पंतप्रधानांची ‘मन की बात’

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

आजचा तरुण वर्ग व्यवस्थेला पसंत करतो, मात्र व्यवस्थेने त्याला योग्य तो प्रतिसाद दिला नाही तर तरुणांच्या मनात समाजातील अव्यवस्था आणि अस्थिरतेबद्दल राग, संताप निर्माण होतो. व्यवस्थेला प्रश्न विचारण्याची हिंमत तरुण दाखवतात. कोणत्याही परिस्थितीत देशाच्या युवावर्गाला अराजकता आवडत नाही असे मत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘मन की बात’ या कार्यक्रमात व्यक्त केले.

देशात ‘सीएए’विरोधात झालेल्या हिंसक आंदोलनात मोठय़ा प्रमाणात विद्यार्थी सहभागी झाले आहेत. त्या पार्श्वभूमीवर त्यांनी हे मत व्यक्त केले. मोदी म्हणाले, ‘आजचा तरुण हा 21व्या शतकातील तरुण आहे.  कोणी या तरुण वर्गाला सोशल मीडिया जनरेशनही म्हणतात. ही पिढी खूप प्रतिभाशाली आहे. त्यामुळेच ही पिढी घराणेशाही, जातीवाद, आपला-दुसर्‍याचा, स्त्री-पुरुष अशा भेदभावांना मानत नाही.’

नवीन व्यवस्थेचे युग

आजचे युग हे नवीन व्यवस्थेचे नवीन युग आहे. त्यामुळे आजच्या तरुण वर्गाकडून मला खूप अपेक्षा आहेत. स्वामी विवेकानंद यांनीही युवकांवरही विश्वास ठेवला होता. या युवावर्गातूनच कार्यकर्ते तयार होतील असा विश्वास मोदी यांनी व्यक्त केला.