
काँग्रेसच्या चीन नीतीवर सातत्याने टीका करणारे, गलवान संघर्षानंतर चिनी वस्तूंवर बहिष्काराची भाषा करणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आता ‘चीन चीन चू’ करू लागले आहेत. शांघाय सहकार्य परिषदेच्या निमित्ताने चीन दौऱयावर असलेल्या मोदींनी आज चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांची भेट घेतली. या भेटीत दोघांचे सूर जुळले. हिंदुस्थान-चीन हे शत्रू नसून विकासाचे भागीदार आहेत, असा सूर दोन्ही नेत्यांनी लावला. एससीओ परिषदेचे अध्यक्षपद यशस्वीरीत्या सांभाळल्याबद्दल मोदी यांनी चीनचे तोंडभरून कौतुक केले. अमेरिकेने लावलेल्या टॅरिफच्या पार्श्वभूमीवर हा दौरा महत्त्वाचा आहे.
आमच्या सहकार्यात जगाचे कल्याण – मोदी
‘हिंदुस्थान व चीनच्या संबंधांना कोणीही तिसऱया देशाच्या चष्म्यातून पाहू नये. एकत्र येणं हे दोन्ही देशांना महत्त्वाचं वाटतं. यातच जगाचे कल्याण आहे. दोन्ही देशांतील 2 अब्ज 80 कोटी जनतेचं हित यात दडलेलं आहे. परस्पर विश्वास, सामंजस्यातून संबंध पुढे नेऊ, असे नरेंद्र मोदी म्हणाले.
आमच्यावर ऐतिहासिक जबाबदारी – जिनपिंग
हिंदुस्थान आणि चीन सर्वाधिक लोकसंख्या असलेले महत्त्वाचे देश आहोत. दोन्ही देशांनी धोरणात्मक आणि दीर्घकालीन दृष्टिकोनातून परस्पर संबंध जपले पाहिजेत. लोकशाही टिकवून ठेवण्याची ऐतिहासिक जबाबदारी आपल्यावर आहे. ती एकत्र मिळून पार पाडली पाहिजे, असे शी जिनपिंग म्हणाले.